गडहिंग्लज : देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले. जनता दलाने यापुढे महाविकास आघाडीसोबत काम करावे, आपण सदैव आपल्या पाठीशी राहू, असे आश्वासनही त्यांनी प्रा. कोरी यांना गुरुवारी दिले.
काँग्रेसच्या बूथ प्रतिनिधींच्या प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त आमदार पाटील गडहिंग्लज-चंदगड दौऱ्यावर आले होते. दरम्यान, त्यांनी सायंकाळी माजी आमदार दिवंगत ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या घरी जाऊन प्रा. कोरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिंदेंच्या पत्नी ऊर्मिलादेवी शिंदे, पुतणे सुनील शिंदे, जावई माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी उपस्थित होते.
ॲड. शिंदे यांनी आपल्या हयातीत जातीयवादी व धर्मांध शक्तींशी कधीही हातमिळवणी केली नाही. सद्य:स्थितीत त्यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसह भावी वाटचालीतही ‘जद’ने महाविकास आघाडीबरोबर यावे, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
तथापि, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रमुख सहकाऱ्यांशी विचारविनिमय होईल. पहिल्यांदा कार्यकर्त्यांशी चर्चा आणि त्यानंतर आमदार पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांसह सविस्तर चर्चेअंती निर्णय घेऊ, असे प्रा. कोरींनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी वाटचालही एकत्र !जनता दलाच्या जिल्हा मेळाव्याच्या वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या, भाषणे ऐकली. म्हणूनच भेटायला आलो. देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी शिंदे यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे. गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीसह आगामी सर्व निवडणुकीतदेखील एकमेकांच्या सोबतीनेच पुढे जाऊया. आपण सर्वशक्तीनिशी जनता दलाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.