कोल्हापूर : कोल्हापूरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलेल्या ‘टोल’चा प्रश्न निकालात काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शनिवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून जल्लोष केला. इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. टोलमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांचे छत्रपती शिवाजी चौकात महानगर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत करून भव्य सत्कार केला. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो....’, ‘पालकमंत्री तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’, ‘केली रे केली भाजपने टोलमुक्ती केली...’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कॉँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असताना प्रशासकीय स्तरावर टोलमुक्तीचा निर्णय घेणे अत्यंत जोखमीचे होते; पण इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली. यासाठी भाजपचे सरकार व मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही कोल्हापुरात विकासाचे पर्व अशाच पद्धतीने पुढे चालत राहील. महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजप तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. रामभाऊ चव्हाण, अशोक देसाई, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, विजय जाधव, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, दिलीप मैत्राणी, सुभाष रामुगडे, संदीप देसाई, सुरेश जरग, गणेश देसाई, अॅड. संपतराव पवार, अमोल पालोजी, मधुमती पावणगडकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रभा टिपुगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टोलमुक्तीबद्दल पालकमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत
By admin | Published: December 27, 2015 1:15 AM