कोल्हापूर : पोलंड देशाचे भारतातील राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्तडेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यू, रॉबर्ड डेझिडिस्क यांचे सोमवारी कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करण्यात आले. तुतारीचा निनाद, कोल्हापुरी फेटा, औक्षण, अशा जंगी स्वागताने पाहुणे भारावलेच; पण देश, सीमा, भाषा आणि सांस्कृतिक भेदाभेदांच्या भिंती दूर करणाऱ्या रंगपंचमीच्या रंगातही रंगून गेले.दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपतींनी आश्रय दिला होता. सप्टेंबर महिन्यात त्या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. कोल्हापूर आणि पोलंडवासीयांचे ऋणानुबंध, या घटनेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना सप्टेंबर महिन्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पोलंडचे राजदूत सोमवारी व मंगळवारी कोल्हापूर दौºयावर आहेत.सोमवारी सायंकाळी हॉटेल सयाजी येथे खासदार संभाजीराजे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना रंगपंचमीची माहिती दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी रंगही खेळले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, रविराज निंबाळकर, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, रवी पाटील, प्रवीण पोवार, अनुप महाजन, हेमंत साळोखे, आशुतोष बेडेकर उपस्थित होते. आज, मंगळवारी ते वळीवडे कॅम्प, शिवाजी विद्यापीठ, सेंट झेविअर्स, ताराराणी चौकाजवळील पोलिश स्मशानभूमी, महावीर उद्यानास भेट देणार आहेत. महावीर उद्यान येथे कोल्हापुरातील नागरिक व मान्यवरांच्या भेटी घेऊन शेवटी नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे छत्रपतींच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्तकरणार आहेत.दुसºया महायुद्धात हिटलरकडून पोलंडवासीय नागरिकांचा मोठा संहार सुरू होता. या निर्वासितांना १९४३ ते ४८ या काळात भारतातील ‘कोल्हापूर’ आणि ‘जामनगर’ या दोन संस्थांनांनी आश्रय दिला. कोल्हापूरचे शहाजी छत्रपती यांनी त्यांना सर्व सोईसुविधा पुरविल्या. त्यांच्यासाठी वळीवडे कॅम्प म्हणजे आताचे गांधीनगर येथे कुटुंब छावण्या तयार केल्या. येथे १० हजार पोलंडवासीय होते. येथे बागा, शाळा, दवाखाना, एक चर्चही उभे राहिले. रस्त्यांना पोलिश नावे दिली; त्यामुळे वळीवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे.