कोल्हापूर : ‘बरं झालं परीक्षा रद्द केली, विद्यार्थ्यांची मानसिकता नव्हती’, ‘सरकारने योग्य निर्णय घेतला आहे’, अशा प्रतिक्रिया सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बारावीच्या परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे.
पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने गेल्या दीड महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यावेळी बारावीबाबतचा निर्णय दि. १ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केला. या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील बारावीच्या दहा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ५५० विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे. या निर्णयाचे परीक्षार्थी, पालक, शिक्षकांनी स्वागत केले आहे. जे विद्यार्थी या विनापरीक्षा पुढील वर्गात जाण्याबाबत समाधानी नसतील त्यांना प्रत्यक्ष परीक्षा देता येणार आहे.
प्राचार्य काय म्हणतात?
सद्यस्थितीचा विचार करता परीक्षा रद्दचा निर्णय स्वागतार्ह आहे. विनापरीक्षा होणाऱ्या मूल्यमापनाबाबत जर एखादा विद्यार्थी समाधानी नसल्यास त्याला प्रत्यक्षात परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅॅशनल स्कूल
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची सध्या मानसिकताच नव्हती. या स्थितीचा विचार करता केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.
गीता पाटील, प्राचार्य, सिम्बॉलिक इंटरनॅॅशनल स्कूल
पालकांच्या मते
सीबीएसई बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली असती, तर त्याद्वारे एक प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे.
-संजय जोशी
कोरोनाच्या स्थिती लक्षात घेवून परीक्षा रद्दचा निर्णय मला योग्य वाटतो. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार करून सीबीएसईने मूल्यमापनाची पद्धत निश्चित करावी.
- शशांक घोसाळकर.
विद्यार्थी काय म्हणतात?
कोरोनाची वाढती स्थिती पाहता परीक्षा देण्याची आमची मानसिकताच नव्हती. त्यामुळे बरं झालं परीक्षा रद्द झाली. बारावीनंतर नीट, जेईई, एनडीएसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे बारावीतील गुणांचा फार मुद्दा येत नाही.
- तुषार चोपडे.
कोरोना वाढत असताना अजूनही लसीकरणही वाढलेले नाही. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. आम्हा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हे सीबीएसईने लवकर जाहीर करावे.
- धवल शिंदे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये : १०
विद्यार्थी संख्या : ५५०