सुसज्ज कार्यालय, तरीही कार्यकर्त्यांची वानवा :कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:21 AM2019-09-26T00:21:01+5:302019-09-26T00:22:31+5:30

कार्यकर्त्यांचे मोठे केडर कॉँग्रेसभोवती होते. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याकरिता, सभा, बैठका घेण्याकरिता एक हक्काची जागा आवश्यक होती. ती गरज तत्कालीन कॉँग्रेस नेत्यांनी ओळखली. निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव कांबळे व एस. के. माळी दोघेजण कार्यालयाची व्यवस्था पाहतात आणि निरोपांची देवाण-घेवाण करतात.

Well-equipped office, still staff | सुसज्ज कार्यालय, तरीही कार्यकर्त्यांची वानवा :कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थिती

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयाची ही नवीन सुसज्ज इमारत.

Next
ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे यांची निवड झाली आणि पक्षाचे भाग्य उजळले.

कोल्हापूर : राज्यात कॉँग्रेस कितव्या क्रमांकावर आहे, याचा फैसला महिन्यानंतर होईलच; परंतु कोल्हापुरातील कॉँग्रेसचे कार्यालय राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे, एवढं मात्र नक्की! प्रशस्त बैठक व्यवस्था, मजबूत व्यासपीठ, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, राहण्याची सुविधा, साउंड सिस्टीम, संगणक, इंटरनेट, टेलिफोन अशा अत्याधुनिक तसेच आवश्यक सुविधांनी युक्त असलेल्या कार्यालयास कार्यकर्त्यांची वानवा असून, गतवैभवाची आस आहे.

कोल्हापूर हा सधन जिल्हा असून, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्ह्यावर कॉँग्रेसचा प्रभाव राहिला. कॉँग्रेसने विणलेल्या सहकाराच्या चळवळीमुळे आर्थिक प्रगती जशी घराघरांपर्यंत पोहोचली तसा कॉँग्रेस पक्षसुद्धा घराघरांतील माणसांत रूजला. त्यामुळे कॉँग्रेसचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी होणं ही एकेकाळची प्रतिष्ठेची बाब होती. कार्यकर्त्यांचे मोठे केडर कॉँग्रेसभोवती होते. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याकरिता, सभा, बैठका घेण्याकरिता एक हक्काची जागा आवश्यक होती. ती गरज तत्कालीन कॉँग्रेस नेत्यांनी ओळखली.

कार्यकर्त्यांना ऊठबस करण्याकरिता १९७८ मध्ये स्टेशन रोडवरील प्रशस्त जागेत पक्षाने कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला. अनंतराव भिडे व एस. आर. पाटील यांनी पुढाकार घेतला आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यांना बसण्याकरिता एक हक्काचे छत्र निर्माण झाले. भरवस्तीत स्टेशन रोडवर कार्यालय असल्यामुळे समोरील बाजूस दहा दुकानगाळे बांधून येणा-या भाड्यातून कार्यालयाचा खर्च भागविला जातो. ३३० चौरस स्क्वेअर फुटांच्या गाळ्याला बरीच वर्षे ३०० रुपये नाममात्र भाडे होते; परंतु अलीकडेच हे भाडे साडेआठ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

१९७८ मध्ये बांधलेल्या बैठ्या इमारतीच्या बाजूस मोकळी जागा होती. त्यावर भव्य हॉल बांधण्याचा मानस यापूर्वी काही जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखविला. १९९९ ते २०१४ अशी सलग १५ वर्षे सत्तेत असल्यामुळे हॉल बांधणेही शक्य होते; परंतु सत्तेत असलेल्या नेतेमंडळींनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. पक्ष कार्यालय असूनही प्रत्येकाने आपली कार्यालये स्वतंत्रपणे सुरू केली. परिणामी कार्यकर्ते कॉँग्रेसच्या कार्यालयात येणे कमी झाले. आजतागायत हीच परिस्थिती कायम आहे.
जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे यांची निवड झाली आणि पक्षाचे भाग्य उजळले.

पक्षाच्या राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुढाकार घेत पक्ष कार्यकर्त्यांची हॉल बांधण्याची इच्छा पूर्ण केली. सहा हजार चौरस फूट क्षेत्रात सुसज्ज असा हॉल बांधण्यात आला आहे. त्यामध्ये एक हजार लोकांची बैठक व्यवस्था, मजबूत व्यासपीठ, कॉन्फरन्स हॉल, अध्यक्षांना बसण्याची खोली, कार्यकर्त्यांना राहण्याची सोय, स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉल बांधला आणि आवाडे पिता-पुत्र कॉँग्रेसमधून बाहेर पडले.

कॉँग्रेसच्या राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये या कार्यालयाचा दुसरा क्रमांक लागतो इतके सुसज्ज व सर्वसोर्इंनीयुक्त ते झाले आहे; परंतु कार्यालयास कार्यकर्त्यांची आस आहे. सगळीकडे मरगळ आल्याचा हा परिणाम असावा. दिवसभर काही मोजकेच कार्यकर्ते कार्यालयात बसून असतात. निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव कांबळे व एस. के. माळी दोघेजण कार्यालयाची व्यवस्था पाहतात आणि निरोपांची देवाण-घेवाण करतात.


जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष

  • रत्नाप्पाण्णा कुंभार 
  • दिनकरराव मुद्राळे
  • महादेव दुंडाप्पा श्रेष्ठी
  • शंकरराव दत्तात्रय माने
  • बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे
  • उदयसिंगराव गायकवाड
  • हिंदुराव बळवंत पाटील
  • अनंतराव रामचंद्र भिडे
  • बाळासाहेब शंकरराव माने
  • एस. आर. पाटील
  • शामराव भिवाजी पाटील
  • डॉ. एस. एस. घाळी
  • बाबूराव आबासो धारवाडे
  • शामराव भिवाजी पाटील
  • काकासो यादव (प्रभारी)
  • शंकरराव पाटील-कौलवकर
  • बाबासाहेब कुपेकर
  • पी. एन. पाटील (सडोलीकर)
  • प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे
  • सतेज डी. पाटील


 

Web Title: Well-equipped office, still staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.