जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील तमदलगेसह जैनापूर, निमशिरगांवमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे़ पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी कसरत सुरू आहे़ प्रतिवर्षी पाणीटंचाईमध्ये या गावांचा समावेश होतो़ सध्या तमदलगे येथे एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असून, येत्या काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ तालुक्यातील तमदलगे, निमशिरगांव, जैनापूर, चिपरी, कोंडिग्रे ही पाच गांवे पाणीटंचाईत मोडतात़ जैनापूर येथे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ तर तमदलगे येथे विहिरींनी तळ गाठला असून, खासगी विहीरधारक टँकरने पाणी आणून त्यामध्ये सोडत आहेत़ जलयुक्त शिवार योजनेतून तमदलगे येथे तलावाचे काम करण्यात आले आहे़ मात्र, या तलावाला आता प्रतीक्षा पावसाची लागून राहिली आहे़ सध्या एक दिवसा आड पाणीपुरवठा असला तरी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे़ गतवर्षी या पाच गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विहिरींनी तळ गाठल्यामुळे नागरिक कूपनलिकांकडे वळले आहेत़ मात्र, कूपनलिकांमधूनही क्षारयुक्त पाणी येत असल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे़ १८ मे नंतर तमदलगे येथे नृसिंह यात्रा, ऊरुसाचा कार्यक्रम होणार आहे़ यावेळी टंचाई जाणवणार आहे़ प्रशासनाने योग्य नियोजनाची मागणी ग्रामस्थांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
तमदलगेतील विहिरींनी तळ गाठला
By admin | Published: April 28, 2016 9:17 PM