कोल्हापूर : लग्नासाठी घर सजले होते. वातावरण मंगलमय... सगळीकडे नुसती लगीनघाई... सीमांत पूजनासाठी मंगल कार्यालयात जाण्याची तयारी सुरू होती. जपानला वास्तव्याला असलेले नियोजित वधू आणि वर येणार होते. त्यांनाच आणण्यासाठी वधुपिता असलेले शिवाजी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक नरेंद्र वामनराव देशपांडे (वय ६३, रा. ताराबाई पार्क) हे पुण्याला निघाले होते. परंतु, शिरवळजवळ ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आणि लग्नघरावर क्षणात शोककळा पसरली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.प्रा. देशपांडे यांची मोठी मुलगी मनाली आणि उत्तरप्रदेशमधील अतुल शर्मा या दोघांचा विवाह शुक्रवारी (दि. ९) होणार होता. गुरुवारी संध्याकाळी सीमांत पूजन होणार होते. दिल्लीला आलेले नियोजित वधू आणि वर दोघेही विमानाने पुण्याला येणार होते. म्हणून त्यांना आणण्यासाठी हौसेने वधूपिता पुण्याला निघाले होते.
परंतु, याच दरम्यान हे अघटित घडले आणि वधूपित्याचाच दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रसिध्द ऑर्थोपेडिक डॉ. सुरेश देशपांडे यांचे नरेंद्र हे बंधू होत. त्यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज शनिवारी सकाळी आठ वाजता आहे.