कोल्हापूर : राज्य सरकारने नवीन वर्षांत रेडिरेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम व्यवसायात थोडी मंदी आहे, त्यातच नवीन वर्षात पंधरा टक्क्यांपर्यंत रेडिरेकनरचे दर वाढविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन होता. सरकारच्या निर्णयामुळे घर, फ्लॅटच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातून सांगण्यात आले. प्रत्येक वर्षी राज्य सरकार राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील रेडिरेकनरचे दर निश्चित करते. प्रत्येक वर्षी हे दर वाढतच असतात. २०१६ सालातही हे दर ९ ते १६ टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव होता; परंतु गुरुवारी हा प्रस्ताव सरकारने फेटाळला आणि रेडिरेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतला. बांधकाम व्यवसायात आधीच मंदी असल्याने पुन्हा रेडिरेकनरचे दर वाढवू नयेत, अशी मागणी राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडे केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे जागा, घर, फ्लॅटच्या किमती वाढणार नसल्या तरी त्या स्थिर राहण्यास मदत होणार असल्याने सर्वांनाच त्याचा दिलासा मिळाला आहे. बांधकाम व्यावसायिकांसाठी हा निर्णय चांगला असल्याची भावना बांधकाम व्यावसायिक राजीव पारिख यांनी व्यक्त केली. घरफाळ्यात वाढ होणारच दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यावर्षी घरफाळ्यात वाढ करणार आहे. त्यावर काही परिणाम होणार का, याबाबत विचारणा केली असता करनिर्धारक दिवाकर कारंडे यांनी सांगितले की, महानगरपालिका सध्या सन २०१०-११ च्या रेडिरेकनर दरानुसार घरफाळा आकारणी करत आहे. नवीन पद्धत स्वीकारल्यानंतर पाच वर्षांनी घरफाळा वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांनुसार नगररचना विभागाला रेडिरेकनरचे दर निश्चित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सरकारने काय निर्णय घेतला यावर कोल्हापुरात घरफाळ्याचे दर वाढणार की नाहीत हे ठरणार नाही. पालिका प्रशासनाने दर वाढविण्याचा आधीच निर्णय घेतला आहे.
‘रेडिरेकनर’ जैसे थे; घरफाळा वाढ अटळ
By admin | Published: December 19, 2015 1:07 AM