गणपती कोळी ।कुरुंदवाड : ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. मात्र, ओल्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो. हमीभाव व हक्काचे पीक म्हणून उसाचे पीक घेत असला तरी शेतकऱ्याला या पिकातून चारा उपलब्ध होत असल्याने ऊस पिकालाच शेतकरी प्राधान्य देतो.
उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी संपूर्ण शेती ऊस पिकाखालीच आणत आहे. नदीकाठची गवती कुरणाची शेतीही ऊस पिकाखाली आली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला की, उसाचा वाडा (शेंडा) चाऱ्यासाठी वापरत असल्याने चाºयाचा प्रश्न मिटतो. हा हंगाम पाच ते सहा महिने चालत असल्याने हा चारा मिरज, सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागापर्यंत जातो. त्यामुळे पशुचालक शेतकºयांचे ऊसतोडी सुरू होण्याकडे लक्ष असते.
ऊसतोड करण्यासाठी बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, तर कर्नाटकातील विजापूर, आदी जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील मजूर येतात. मात्र, ऊस वाहतूकदार, कारखान्यांकडून पैशाची उचल करूनही अनेक मजूर ऊसतोडीसाठी येत नसल्याने ऊस वाहतूक करणाºया वाहनमालकांचे लाखो रुपये बुडत होते. अनेक वाहनमालक आत्महत्येपर्यंत पोहोचले होते. शिवाय मजूर टोळ्यांची संख्या घटल्याने उन्हाळ्यात साखर कारखान्यांना ऊसपुरवठा कमी होत होता. त्यामुळे ‘नो केन’ करावे लागत असल्यानेसाखर कारखान्यांनाही आर्थिक फटका बसता होता.
या मजुरांवर पर्याय म्हणून साखर कारखान्यांनी ऊसतोड मशीन आणली आहेत. प्रारंभीच्या काळात या मशीनच्या तोडीला शेतकरी नकार देत होते. मात्र, गतवर्षी हा प्रयोगसर्वच कारखान्यांनी यशस्वी केल्याने यंदाच्या गळीत हंगामातमशीनचा सर्रास वापर होणार आहे. अनेक गावांत तीन ते चार शेतकºयांनी एकत्र येऊन एक कोटीपर्यंतच्या खर्चाचे ऊसतोडणी मशीनघेतल्याने मशीनव्दारे ऊसतोडणीची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.तोडणी मजुरांवर पर्यायऊसतोडीसाठी मशीन आल्याने तोडणी मजुरांवर पर्याय निघाला असला तरी मशीनमध्ये उसाचा शेंडा (वाडा) बारीक करून फेकला जात असल्याने चारा मिळणार नाही. त्यामुळे सध्या चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. गळीत हंगाम सुरू होण्याकडे पशुपालक शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मशीनने ऊसतोडीचे प्रमाण वाढणार असल्याने चाºयाचे दरही भडकणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात चारा टंचाई भासणार असल्याने गळीत हंगामातही चाऱ्याची समस्या गंभीर बनणार आहे, हे निश्चित.