कोल्हापूर : सरनोबतवाडी (ता. करवीर) तील सेवा रस्त्यावर ३ कोटी ४१ लाख ३० हजार रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा जणांना आज, शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ३ किलो ४१३ ग्रॅम वजनाची ही उलटीसह चारचाकी जप्त करण्यात आली.यातील प्रदीप शाम भालेराव (वय ३६, शहाजीनगर,अजीज बाग, आर.सी.मार्ग, मावळरोड, चेंबूर, मुंबई), शकील मोईन शेख (वय३४, माणिकनगर, येरवडा, पुणे), अमीर हाजू पठाण (वय ३२, विश्रांतीवाडी, भैरवनगर, गणपती मंदीरजवळ, पुणे) या संशयितांना ताब्यात घेऊन गांधीनगर पोलिस ठाण्याकडे सुपुर्द केले.पोलिसांनी सांगितलेली माहीती अशी की, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानूसार यातील एका पथकातील सहायक फौजदार श्रीकांत मोहीते व कर्मचारी वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून पुणे-बंगळूरू महामार्गालगतच्या सरनोबतवाडीतील सेवा रस्त्यावर काहीजण प्रतिबंधीत व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्याकरीता येणार असल्याचे समजले. त्यानूसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेसह वनखात्याने सापळा रचला.त्यानूसार संशयित चारचाकी तेथे आल्यानंतर ती अडविण्यात आली. त्याची तपासणी केल्यानंतर त्यात ३ कोटी ४१ लाख ४३ हजारा रूपये किंतीची ३ किलो ४१३ ग्रॅम वजनाची ही उलटी मिळून आली. त्यातील संशयित प्रदीप भालेराव, शकील शेख, अमीर पठाण या तिघांना चारचाकीसह ताब्यात घेण्यात आले. या तिघांसह एकूण ३ कोटी ४४ लाख ६५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला असून तिघांवर बेकायदेशीररित्या प्रतिबंधीत व्हेल माशाची उलटी बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, श्रीकांत मोहीते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, रफीक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी सहभाग घेतला.
Crime News: साडेतीन कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी, कोल्हापुरात तिघांना अटक
By सचिन भोसले | Published: November 04, 2022 6:32 PM