संदीप आडनाईक
कोल्हापूर : वनविभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापुरात गुरुवारी सापळा रचून अमूल्य किंमतीची व्हेल माशाची उलटी (‘एम्बर्ग्रिस’) आणि इतर मुद्देमाल जप्त केला. याची तस्करी होण्याचे कारण म्हणजे याची आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारी प्रचंड किंमत. व्हेलच्या उलटीला ‘समुद्रातील सोनं’ म्हणतात.गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीच्या घटनांमध्ये यामुळेच वाढ झाली आहे. यामध्ये सुकवलेले समुद्री घोडे, प्रवाळ, सी-फॅन, शार्क माशांचे पंख आणि ‘एम्बर्ग्रिस’चा समावेश आहे. आताही ‘एम्बर्ग्रिस’च्या तस्करीचे हे प्रकरण समोर आल्याने, छुप्या पद्धतीने याची होणारी तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सागरी परिक्षेत्रात व्हेल म्हणजेच देवमाशाच्या ‘ब्लू व्हेल’, ‘बृडस् व्हेल’, ‘हम्पबॅक व्हेल’, ‘स्पर्म व्हेल’, ‘ड्वार्फ स्पर्म व्हेल’, ‘कुविअरस् बिक्ड व्हेल’ या प्रजातींचा अधिवास आहे. ‘स्पर्म व्हेल’च्या उलटीला ‘एम्बर्ग्रिस’ म्हणतात.
अत्तरासाठी उपयोग
‘एम्बर्ग्रिस’ हा काळा, पांढरा आणि राखाडी रंगाचा एक तेलकट आणि ज्वलनशील पदार्थ आहे. समुद्रात तरंगताना त्याला अंडाकृती किंवा गोल आकार येतो. सुरुवातीला ‘एम्बर्ग्रिस’ला सुगंध नसतो. परंतु, हवेबरोबर या पदार्थाचा संपर्क वाढल्यानंतर त्यामधील सुगंध वाढत जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सुगंधित वस्तू खास करून अत्तर तयार करण्यासाठी ‘एम्बर्ग्रिस’चा मोठा उपयोग होतो.
तरंगणारे सोने
- ‘एम्बर्ग्रिस’ हे परफ्यूममधील सुगंधाला हवेमध्ये उडू देत नाही. ते दुर्मीळ असल्याने त्याची किंमतदेखील खूप जास्त असते. त्याला समुद्री सोने किंवा तरंगणारे सोनेदेखील म्हणतात. त्याचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे.- आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रति किलो कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. याची किंमत ऐकून तस्करी वाढू शकते म्हणून वनखाते ते कधीच जाहीर करत नाही ‘एम्बर्ग्रिस’ला अरब देशांमध्ये मोठी मागणी आहे. गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळमधून ‘एम्बर्ग्रिस’ची तस्करी केली जाते.- भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत १९८६ सालापासून ‘स्पर्म व्हेल’ला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे, वा त्याच्या कोणत्याही शारीरिक अवयवाची वा घटकाची तस्करी किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.