कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राजकीय संकेत पायदळी तुडवत अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरली. राजकारणात टीका सर्वमान्य असली तरी खालच्या दर्जाला जाऊन आणि सातत्याने उठसूट तोंडसुख घेणे हे कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांना विचारला.
महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, हेमंत आराध्ये या पदाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, एका बाजूला सत्ता येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच शिवसेना नेते मुश्रीफ यांना जातीवादी वाटत होते. मात्र सत्तेचा बिछाना उबवत असताना ते सातत्याने सर्वच मंत्र्यांची तळी उचलून धरताना वकिली स्वीकारली आहे का? ज्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम पाहतात, त्या जिल्ह्याची उठाठेव करण्याऐवजी उठसूट कागलमध्ये बसून चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खडे फोडणे बंद करावे.
लॉकडाऊन काळामध्ये गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावला असताना जबाबदार मंत्री म्हणून लक्ष देण्याऐवजी शाब्दिक नंगानाच करत आहात. या त्यांच्या कोल्हेकुईमुळे लोकांचे मनोरंजन होत आहे, ते त्यांनी थांबवावे.