कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी भेट झाली. या भेटीचा राज्यभर चर्चा होत असताना ती भेट कौटुंबिक होती. केवळ काका-पुतण्या म्हणून ही भेट झाल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, अजित पवार यांना यासंदर्भात विचारणा केली असताना शरद पवार यांनी उत्तर दिल्यानंतर आता मी काही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. दरम्यान, पत्रकारांनी अजित पवार यांना मनसेच्या भाजपासोबत येण्यासंदर्भातील प्रश्न विचारला. त्यावर, अजित पवारांनी थेट, माझा काय संबंध... असे म्हणत उत्तर दिले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याच बैठकीत राज ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. भाजपाकडून युतीची ऑफर मिळाली आहे पण अद्याप आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार यांचे भाजपा काय करणार, पुढचे गणित कसे जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करू नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे आहे, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरेंच्या या विधानाला अनुसरुन अजित पवार यांना कोल्हापुरात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते काहीसे चिडल्याचं दिसून आलं.
भाजपने त्यांना ऑफर दिलीय, त्यावर मला काय करायचंय. तुम्हाला उद्या भाजपने ऑफर दिली तर, तो तुमचा आणि भाजपचा संबंध आहे. मला काय करायचं. माझ्याशी संबंधित असलेले प्रश्न आणि राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रश्न जरूर विचारा. मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.