कोल्हापूर : पक्ष, गट, तट न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली, तीच भूमिका घेऊन आम्ही येथून पुढेही जिल्ह्याचे राजकारण करणार आहोत. आमची विराट कोहलीची टीम आहे, त्यात आमदार हसन मुश्रीफ हे आमचे कॅप्टन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले जाईल.
निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक संदर्भच महत्त्वाचे ठरले आहेत, त्यामुळे कोणी कोणाला पाडले, कोणी निवडून आणले हे आता कॉलरला हात लावून कोणी बोलू शकत नाही. कोणी हे बोलू देखील नये, लोकांनीच ठरवले आहे, ऊन-पावसाचे खेळ चालायचेच असे समजून पुढे समन्वयाने चालावे, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजू आवळे, विनय कोरे, पी. एन. पाटील, राजेश पाटील हे सहाजण आमदार झाले आहेत. जिल्हा बँकेच्या आजवरच्या इतिहासात आमदार संचालक झाले आहेत, पण संचालक कधी आमदार झालेले नाहीत. ही बाब कौतुकास्पद असल्याने जिल्हा बँकेतर्फे गुरुवारी सत्कार सोहळा झाला.
खासदार मंडलिक यांच्या हस्ते मुश्रीफ, यड्रावकर, राजेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. पी. एन., आवळे, कोरे बाहेरगावी असल्याने गैरहजर राहिले. व्यवस्थापकीय संचालक ए. बी. माने प्रमुख उपस्थित होते.मंडलिक म्हणाले, साडेचार वर्षांपूर्वी बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आल्याने आज बँकेला उभारी मिळाली. जिल्ह्यात आम्ही आठवरून एकवर आलो असलो तरी राज्यात आम्हीच सत्तेवर येणार असल्याने प्रश्न सुटणार आहेत. जनतेचा जनादेश पाहिला तर शहरात शिवसेना-भाजप आणि ग्रामीणमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रश्न सोडवायचे आहेत.
गट, तट बाजूला ठेवून समन्वयाने काम करण्याची गरज आहे. यड्रावकर यांनी तर इकडे तिकडे न पाहता शिवसेनेसोबत यावे, अशी खुली आॅफरही मंडलिक यांनी दिली. आमदार राजेश पाटील यांनी नरसिंगराव पाटील, बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक या तीन दिवंगत नेत्यांच्या योगदानामुळेच मी या निवडणुकीत विजयी झालो असे सांगताना सर्वांचीच मदत झाल्याची कबुली दिली. संचालक भय्या माने यांनी प्रास्ताविक केले. ए. बी. माने यांनी आभार मानले.