आॅनलाईन/लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : एकीकडे तूर खरेदी करायची आणि लगेच त्याची विक्री केल्याने बाजारातील तुरीचे दर घसरत चालले आहेत. तूर विक्रीसाठी सरकारच्या गडबडीमागील गौडबंगाल काय? असा सवाल करत तुर खरेदीत ‘नाफेड’ च्या अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
सरकारने ताबडतोब तूर विक्री थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून तूर खरेदी सुरू केली पण ‘नाफेड’च्या अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी व व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांना शेंड्या लावल्या. ३८ लाख क्विंटल तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांच्या घरात तूर असेल तर ‘नाफेड’ने नेमकी कोणाची तूर खरेदी केली. व्यापाऱ्यांनी ३८-४० रुपयांनी खरेदी केलेली तूर ‘नाफेड’च्या गळ्यात ५०.५० रुपयांना मारली.
परभणी बाजार समितीतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर आलेला माल पावत्या न करता खरेदी केलेला दिसतो. या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेला तर तूर खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा कोणी केला, हे बाहेर येईल. तुरीचे दर घसरल्याने खरेदीत ‘नाफेड’ने हस्तक्षेप केल्याने दर वाढला पाहिजे. हा सरकारचा उद्देश होता, पण तसे होते का? दिवसेंदिवस बाजारातील दर घसरत चालले आहेत.
सध्या ३८ ते ४६ रुपयांपर्यंत दर राहिले आहेत. त्याला सरकारचे धोरणच जबाबदार असून खरेदी केलेली तूर तातडीने विक्रीसाठी खुली करण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे. सरकार तोट्यात व्यवसाय करून नेमका कोणाचा फायदा करत आहे, असा सवालही खासदार शेट्टी यांनी केला. सरकारने तूर खरेदी करत असताना विक्री बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांची तूर घरात अन्....
सरकारचे तूर खरेदीचे धोरण म्हणजे ‘शेतकऱ्यांची तूर घरात आणि व्यापाऱ्यांची तूर ‘नाफेड’च्या दारात’ असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही खासदार शेट्टी यांनी केली.