लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहायक दुग्ध निबंधकांचा आदेशाचे तातडीने पालन केले जाते, हा आदेश तर थेट मुख्यमंत्र्यांचा होता. त्यामुळे मुरलीधर जाधव यांना तत्काळ कामकाजात सामील करून घेणे गरजेचे होते, त्यांच्याविषयी जे घडलंय ते चुकीचेच असल्याची कबुली ‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी शिवसैनिकांसमोर दिली. त्यातून ‘गोकुळ’ प्रशासन व संचालक मंडळाची परस्परविरोधी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.
मुरलीधर जाधव यांनी डी. व्ही. घाणेकर यांच्याशीच चर्चा करण्याचा आग्रह धरल्यानंतर ते आले. शासनाचे पत्र संचालक मंडळासमोर ठेवले का? अशी विचारणा जाधव यांनी केल्यानंतर सहकारी संस्थेमध्ये अध्यक्ष हे विषयपत्रिकेवरील विषय निश्चित करत असतात, त्यांनी याबाबत काहीच सांगितले नसल्याचे घाणेकर यांनी सांगितले. मागील संचालक मंडळात अनिल यादव यांची नियुक्तीपत्र प्राप्त होताच तातडीने केली होती. तुम्हाला येथे पर्यंत यावे लागते, हे दुर्दैवी आहे, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे घाणेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा
जाधव यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून दोनवेळा विचारणा झाली, त्याचबरोबर नियुक्ती पत्राबाबतही अहवाल मागविल्याची माहिती डी. व्ही. घाणेकर यांनी दिली.
आंदोलकही झाले अवाक्
घाणेकर यांना जाब विचारायचा या इराद्यानेच शिवसैनिक आले होते. मात्र ते आल्यानंतर त्यांची भाषा पाहून सगळेच अवाक् झाले. हे सगळे पाहून एक शिवसैनिक म्हणाला, साहेब एवढे गोड बोलता मग आतापर्यंत नाव का घातले नाही? यावर घाणेकर यांनी हसूनच दाद दिली.