कोल्हापूर : २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत निवडणुकीशी संबंधित ९१ गुन्हे दाखल झाले होते. यातील सहा गुन्ह्यांमधील संशयितांची निर्दोष मुक्तता झाली असून, ६४ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
निवडणुकीत दाखल झाले होते ९१ गुन्हे२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, आचारसंहितेचा भंग करणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणे, बेहिशोबी रकमांची अवैध वाहतूक करणे, अमली पदार्थांची वाहतूक करणे, असे ९१ गुन्हे दाखल झाले होते.
६४ खटले न्यायालयातदाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी ७१ गुन्ह्यांमधील आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यापैकी ६४ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. यातील काही खटल्यांमध्ये लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे.
सहा निर्दोषएकूण ९१ गुन्ह्यांमध्ये १५८ संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले होते. सहा खटल्यांमध्ये सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने संशयितांची निर्दोष मुक्तता झाली. उर्वरित खटल्यांचे कामकाज सुरू आहे.
पोलिसांची करडी नजरयंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी संशयित गुन्हेगार, गुंड यापूर्वी निवडणूक काळात गुन्हे दाखल झालेल्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच अमली पदार्थाची अवैध वाहतूक आणि विक्री होऊ नये, यासाठी ३४ ठिकाणी तपासणी नाके सक्रिय केले आहेत.