कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील शाहू महाराजांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत पुतळा बदलू, अशी विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्वाही दिली हाेती. परंतु या ग्वाहीनंतर काहीही पुढे झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनातील आश्वासन तरी उपमुख्यमंत्री पाळणार की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे हे त्यांंच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ आणि ५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केले होते. ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर ‘लोकमत’ने हा योग्य मुद्दा उचलल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटली होती. कारण अतिशय कृश असा हा पुतळा शाहू महाराजांचा वाटतच नव्हता. तर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा तर त्यांच्या भारदस्तपणाला शोभेल असा अजिबात नाही, ही वस्तुस्थिती मांडण्यात आली होती.
या प्रश्नावर ५ जुलै रोजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. यावर गरज पडल्यास खासदार शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा करून आवश्यकता असेल तर पुतळा बदलू अशी ग्वाही चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यानंतर पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर महिनाभरापूर्वी आले होते तेव्हा सर्व पत्रकारांनी त्यांना निवेदनही दिले होते. परंतु अजूनही या प्रश्नी पुढे काहीच झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही बघून घेऊयाबाबत वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला. त्यावेळी अजित पवार यांनी आश्वासन दिले होते. ते पुढे काय काय करतात ते पाहूया. नाहीतर आम्ही आहोतच. काय करायचे ते बघून घेऊ. वडेट्टीवार नुकतेच कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती.