कोल्हापूर : थेट पाइपलाइन पाणी योजना झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी उपस्थित केला.कोल्हापूर उत्तरचे भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे आज, शुक्रवारी सकाळी ‘मिसळ पे चर्चा’ झाली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील या मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही. असा प्रश्न विचारुन पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला.धनंजय महाडिक म्हणाले, महापालिकेच्या उद्यानात स्वखर्चातून महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता; पण श्रेयवादासाठी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे अजूनही कोल्हापूरकरांना किमान नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात अनेक विकासकामे उभी केली. कोल्हापूर टोलमुक्त केले; पण विद्यमान पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. याउलट सुरू असलेले विकास प्रकल्प बंद पाडण्याचे कामच त्यांनी केले.सत्यजित कदम म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी अशी आमची भूमिका होती; पण विरोधकांची विकासावर बोलण्याची मानसिकता नाही. महापालिकेच्या माध्यमातून काम करीत असताना, विकासकामांची मागणी केली, त्याला मान्यता देण्याऐवजी आडकाठी आणण्याचे काम करण्यात आले.
थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 2:51 PM