भारतात सध्या सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोविशिल्डच्या दाेन डोसमधील अंतर तीन महिन्यांचे करण्यात आले आहे, तर कोव्हॅक्सिन एक महिन्यानंतर दिली जात आहे. आपण पहिला डोस कोणत्या लसीचा घेतला आहे, दुसरा डोस देखील त्याच लसीचा घेणे सध्या बंधनकारक आहे. परदेशामध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचा देण्यात आला आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती अधिक वाढते असा एक निष्कर्ष आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस दिला तर अधिकच चांगले अशीही चर्चा आहे. भारतात आणि राज्यातदेखील दोन्ही डोस एकाच लसीचे घ्यावेत, असा नियम आहे. तसेच वेगवेगळ्या डोस देण्याचा प्रकार अन्य जिल्ह्यांत झाला असला, तरी कोल्हापुरात मात्र तशी एकही केस झालेली नाही.
---
व्हायरसच्या स्वरुपातदेखील बदल
कोरोना संसर्गाच्या विषाणुंचे स्वरूपदेखील गेल्यावर्षभरात बदलत गेले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लसींचे संशोधन व नवनिर्मिती झाली त्यावेळी कोरोनाचे स्वरूप वेगळे होते, आता वेगळे आहे. कोणतीही महामारी आली की काही वर्षांनी विषाणूची नागरिकांना बाधित करण्याची क्षमता कमी होते असा आजवरचा अनुभव आहे. पण हा विषाणू सगळ्यांसाठीच नवीन आणि मानवनिर्मित असल्याची चर्चा असल्याचे त्याचा किती काळ नागरिकांना सामना करावा लागेल हे अजून तरी अनिश्चित आहे. त्यामुळेच दोन वेगवेगळे डोस घेतले की कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा सामना करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
---
लस माणसामध्ये ॲंटिबॉडीज तयार करतात. त्यामुळेच दोन वेगवेगळ्या लसी बदलत्या विषाणूवरही अधिक परिणामकारक असल्याची चर्चा आहे, पण ते खरेच असेल असं आपण सध्या तरी म्हणू शकत नाही. व्हायरसचे स्वरुपदेखील वारंवार बदलते आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात नागरिकांना एकाच लसीचे दोन्ही डोस दिले जात आहेत.
डॉ. अनिल माळी (जिल्हा शल्यचिकित्सक)
--
लसींवर संशोधन करणारे स्वतंत्र टास्क फोर्स असते. वेगवेगळ्या लसींचा प्रयोग परदेशांमध्ये केला गेला आहे, भारतात तरी अजून तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध असलेल्याच लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
डॉ. फारुख देसाई (जिल्हा लसीकरण विभाग अधिकारी)
---
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यांचे प्रकार आणि परिणाम वेगळे आहेत. लसींच्या कॉकटेलने झालेल्या परिणामांची आपल्याला माहिती नाही, तसे निर्देशदेखील नाहीत, शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच नागरिकांनी एकाच लसीचे डोस घ्यावेत.
डॉ. अमोलकुमार माने (मनपा, लसीकरण विभाग अधिकारी)
--
जिलह्यात आत्तापर्यंत झालेले लसीकरण
६० वर्षांवरील नागरिक : पहिला डोस : ४ लाख ५ हजार ३३९ , दुसरा डोस : १ लाख १९ हजार ५४०
४५ ते ६० वयोगटातील : पहिला डोस : ३ लाख ९४ हजार १५६, दुसरा डोस : ६२ हजार ९१३
१८ ते ४४ वयोगटातील : पहिला डोस : १५ हजार ४५१ , दुसरा डोस : ४७८
----