कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद आमच्यासाठी फक्त गाडीवर पाटी लावण्यापुरतेच राहिले आहे. ग्रामपंचायत सदस्य भागात १० लाखांची विकासकामे करतोय अन् तुम्ही नियोजनचे सदस्य असूनदेखील १० रुपयांचा निधी आणत नाही, असे आम्हाला लोक ऐकवतात. वॉचमनच्या पलीकडे आमचे काम राहिले नाही. निमंत्रित सदस्य निधी मागू शकतात की नाही? मागू शकत असू तर आम्हाला निधी का दिला जात नाही? असा उद्विग्न सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी विचारला.सदस्य दशरथ काळे यांनी निधीच्या मागणी करत म्हणाले, निमंत्रित सदस्यांचे अधिकार काय, ते कोणती विकासकामे प्रस्तावित करून निधीची मागणी करू शकतात, हे आम्हाला एकदा स्पष्ट करा. जिल्हा नियोजन समितीला २४ पत्रं दिली तरी अजून आम्हाला त्यावर उत्तर मिळालेले नाही. नियोजन अधिकारी म्हणतात, प्रस्तावाला पालकमंत्र्यांची मान्यता हवी. पालकमंत्री इथे नसतात. आता आम्ही तुम्हाला भेटायचं कुठं? त्यांच्या या प्रश्नावर सभागृहात एकच हशा पिकला.माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना भागातील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक माने यांनीही हीच मागणी करताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भावी आमदार म्हणून तरी निधी द्या, असे सांगताच सर्वांनी हसून त्यांना दाद दिली.
कोण काय म्हणाले..?
- राजेश क्षीरसागर : फुटबॉल अकादमीसाठी जागेची तरतूद करावी, मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या वस्तादांना मानधन द्यावे.
- प्रकाश आबिटकर : गव्यांपासून होणारे नुकसान टाळावे, नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी.
- जयश्री जाधव : शाहू मिल विकासकामांसाठी निधी द्यावा.
- आमदार राजेश पाटील : जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय व्हावे. चंदगडमधील एसटी बसेसची संख्या वाढवून रिक्त पदे भरावी.
- ऋतुराज पाटील : सामान्य शिक्षणावरील निधी वाढवावा.
- खासदार धनंजय महाडिक : एनसीसी भवनाजवळील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी संरक्षक भिंत व्हावी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडासाठी निधी द्यावा.
- खासदार धैर्यशील माने : वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाय करा.
- प्रवीण पवार : शाहू मिलमध्ये एक टेक्सटाईल विद्यापीठ व स्पिंडल मिल सुरू करा.