भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती कारखान्याची नोकर भरती कोणाच्या हिताची आणि फायद्याची हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. नोकर भरतीतून सभासदांच्या हातात काय मिळणार आणि कारखान्याची आर्थिक प्रगती काय होणार, यावर प्रश्नचिन्ह असून यात काही जणांचे हात ओले होणार हे मात्र निश्चित.भोगावती कारखान्याकडे सध्या ६५० कर्मचारी आहेत. संचालकांनी सिव्हीलच्या नावावर काही जागा भरल्या आहेत. त्या वाढल्यास कामगाराची संख्या सातशेच्या वर जाते. सध्या साडेसहाशे कामगारांना १ कोटी ८० लाख पगाराची एकूण रक्क्म द्यावी लागते. यात कामगार भरती केल्यास भोगावती कारखान्याच्या कामगारांची पगाराची रक्कम दोन कोटीच्या वर जाते. राज्यात सार्वाधिक पगाराची रक्कम असणारा भोगावती हा एकवेम कारखाना आहे, इतर चार हजार गाळप क्षमतेचा कारखान्याच्या पगाराची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. कारखान्यात काही अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. पदावर संचालकांनी आपल्या नातेवाइकांची वर्णी लावली आहे. आता या जागा सोडून जादा जागांची ही मागणी काही संचालक करीत आहेत. त्यामुळे भरती झालीच तर पुन्हा नातेवाइकांची खोगीर भरती होणार हे निश्चित. निवडणुकीत खळ लावणारा कार्यकर्ता बाजूलाच राहणार आहे. कारखान्यात काँगे्रसची सत्ता असताना युवकांना रोजंदारीवर कामावर घेतले. त्यांना कायम करता आले नाही म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोनवेळा आंदोलन केले ;पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नोकर भरतीवरून अशोकराव पाटील आणि विश्वास वरूटे यांनी दिलेला राजीनामा यातून संचालक मंडळ आणि शे. का. पक्षातील अंतर्गत धुसफुस दिसून येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असे अशोक पाटील यांनी म्हंटले आहे. मुळात उपाध्यक्ष हे केरबाभाऊ पाटील हे शे. का. पक्षाचे आहेत. त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अशोक पाटील यांनी फायद्यासाठी विश्वास वरूटे यांचे नाव पुढे आणून माजी आमदार संपतराव पाटील यांनाचा आवाहन दिले होते. आता मध्यंतरीच्या काळात दोघांच्यात फारसे सख्य काय जमलेले नाही. सामान्य ऊस उत्पादक सभासद मात्र शांत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मात्र तो आपली पत्ते खोलून दाखवील यात शंक नाही. नोकर भरतीच्या एवढ्या गंभीर प्रश्नाबाबात या पॅनेलचे नेते माजी. आ . के. पी. पाटील, संपतराव पाटील, अरूण सोनाळकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे अद्याप मौन आहे. शे. का. पक्षाची अशी अवस्था असताना राष्ट्रवादी देखिल फारसे आलबेल नाही, या भरतीला जरा दमान घ्यावे, असे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची सूचना असताना काही संचलकांना नोकर भरती व्हावी, अशी भावना आहे. यात कारखान्याचा विचार किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.
‘खोगीर’ भरतीतून सभासदांच्या हातात काय?
By admin | Published: October 12, 2015 11:39 PM