रमेश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : येथील बावडा पॅव्हेलियन ग्राउंडवर सुरू करण्यात आलेल्या कोरोना सेंटरला कसबा बावड्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. सेंटरला काय हवं ते फक्त सांगा, आम्ही तुम्हाला लगेचच त्या वस्तू पोहोच करतो, अशी विचारणा दानशूर व्यक्तींकडून होऊ लागली आहे. त्यामुळे बावडा सेंटरला कोणत्याच गोष्टीचा तुटवडा भासत नसल्याचे सध्या चित्र आहे.
डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर महापालिका, जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने बावडा पॅव्हेलियनमध्ये ४६ ऑक्सिजनचे व १४ नॉन ऑक्सिजनचे असे एकूण ६० बेडचे ५ मे पासून कोरोना सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये कसबा बावड्याबरोबरच जिल्ह्यातील रुग्ण दाखल झाले आहेत. सर्व सोयींनीयुक्त व मोफत उपचार होत असलेल्या या सेंटरला आता दानशूर व्यक्तींकडून वस्तू स्वरूपात मदत सुरू झाली आहे.
या सेंटरला लागणारी कोणी औषधे दिली, कोणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची सोय केली, कोणी सेंटर स्वच्छ करण्यासाठी लागणारे झाडू, खराटे, सॅनिटायझर व इतर स्वच्छतेचे साहित्य दिले, तर कोणी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय केली आहे. कोणी रुग्णांसाठी फळे देत आहेत. दिलेले साहित्य एक-दोन दिवसांत संपत असल्याने पुन्हा नवीन साहित्य वेगवेगळ्या व्यक्तींकडून येथे सातत्याने येतच आहे.
सध्या दानशूर व्यक्ती सेंटरला नेमकं काय पाहिजे याची लिस्ट घेतात व त्याप्रमाणे साहित्य आणून देत आहेत. त्यामुळे या सेंटरला सध्यातरी कशाचीही कमतरता नाही.
डॉ. नेजदार नावाचा देवदूत...
या सेंटरमध्ये महापालिकेचे सहा डॉक्टर आहेत. त्यांना स्थानिक डॉ. संदीप नेजदार व डॉ. तसीलदार मदत करीत आहेत. डॉक्टर नेजदार येथे दिवस-रात्र भेट देऊन रुग्णांवर उपचार करीत त्यांना दिलासा देत असल्याने त्यांना रुग्णांचे नातेवाईक देवदूत म्हणून संबोधत आहेत.