आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : शेतकरी आंदोलकांच्या ९० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. उर्वरित १० टक्के मागण्यांवर उद्या, सोमवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल. अशा पद्धतीने सरकार सकारात्मक असताना रेलरोकोसारखे आंदोलन करायची गरज आहे का? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथील निवासस्थानी ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दिवसभर उपस्थित होेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शेतकरी आंदोलकांच्या ९० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
उर्वरित १० टक्के मागण्यांबाबत सोमवारी दुपारी १ वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर होणाऱ्या उच्चाधिकार मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल. एकंदरीत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत असताना पुन्हा रेलरोकोसारखे आंदोलन करण्याची गरज आहे का? मित्र पक्ष शिवसेनेला आणखी सन्मान देण्याचा प्रयत्न इथून पुढील काळात राहणार आहे.
ते पुढे म्हणाले, वाढदिवसानिमित्त जमा झालेले खत शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे. या हंगामात भातासह इतर उत्पादने बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील. तसेच खरेदी केलेली उत्पादने कमी भावाने बाजारात विकून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.