संदीप बावचे -- शिरोळ तालुक्यात काँग्रेससह, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप या पक्षातील नेत्यांनी जि. प. व पं. स.च्या काही जागांवर एकाच गट व गणातील दोघा उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने नेमकी उमेदवारी कोणाला याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. नेत्यांनी उमेदवारीची पत्ते ऐनवेळी ओपन करण्याचे ठरविल्याने इच्छुक उमेदवारांची मात्र घालमेल वाढली आहे़ निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवसच उमेदवारांना मिळणार आहेत़ १३ फेब्रुवारीला माघारीदिवशी कोण-कोण माघार घेणार, तर कोणाचा पत्ता कट होणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे़ जिल्हा परिषदेच्या ७ व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे़ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शिरोळ तालुक्यात राजकारणात रंगत आली आहे़ दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब केला आहे. जि.प.च्या उदगाव, दानोळी येथील जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पेच निर्माण झाला आहे. बेबीताई भिलवडे यांच्या दानोळी मतदारसंघातील अपक्ष उमेदवारीमुळे यड्रावकर कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानीने पंचायत समिती मतदारसंघात काही दुबार अर्ज ठेवल्यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे़ थांबा आणि पहा ही भूमिका नेत्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे, तर भाजपने पंचायत समितीच्या १३ व जिल्हा परिषदेच्या सहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना-भाजप युतीची शक्यता असल्याने जागा वाटपात सध्या घोडे अडल्याचे समजते. त्यामुळे भाजप व शिवसेनेकडून कोणाचा पत्ता कट होणार, याकडे लक्ष लागून आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी झाकली मूठ ...! याप्रमाणे उमेदवारांच्या निर्णयाची भूमिका घेतल्याने शेवटच्या क्षणी उमेदवारांचे पत्ते ओपन करण्याचा मनसुबा आखल्याचेच दिसून येत आहे़ १३ फेब्रुवारीला माघारीचा अंतिम दिवस असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर स्वभिमानी व शिवसेना, भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार आहे़ माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, उमेदवारांना प्रचारासाठी केवळ सात दिवस मिळणार आहेत़ यामुळे उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे़ माघारीकडे इच्छुक उमेदवारांबरोबर मतदारांचे लक्ष लागून राहिले असून, कोण-कोण माघार घेणार व कोणाचा पत्ता कट होणार, हे माघारी दिवशीच स्पष्ट होईल़ तसेच बंडखोरीचा झेंडा घेऊन निवडणूक रिंगणात राहणाऱ्या उमेदवारांबाबतही उत्सुकता आहे़ नेत्यांची राजकीय गणितेशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दत्तवाड, अब्दुललाट, नांदणी व शिरोळ या मतदारसंघांतील लढतींकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. सत्तेसाठी काय पण, अशी भूमिका नेत्यांनी घेऊन सोयीच्या आघाड्या व युती झाल्याने यंदाची ही निवडणूक तितकीच महत्त्वाची बनली आहे. नेत्यांनी मतदारसंघात वेगवेगळी गणिते मांडून पडद्यामागच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. २३ फेब्रुवारीला निकालानंतरच नेत्यांचे राजकीय गणित कितपत यशस्वी झाले, हे समजणार आहे.
शिरोळ तालुक्यात सत्तेसाठी काय पण
By admin | Published: February 09, 2017 10:03 PM