दुधगाव : देशात ललित मोदीने अडीच ते तीन हजार कोटी व विजय मल्ल्याने ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. नुकतेच नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार ३०० कोटीस बुडवले. ही सर्व बडी मंडळी परदेशात पळून जाऊन मौजमजेचे जीवन जगत आहेत. मग स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान मोदी काय करीत आहेत? असा सवाल माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केला. हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या स्मारकास तातडीने निधी देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. पाटील यांच्या स्थानिक निधीतून कवठेपिरान (ता. मिरज) येथील हाळ भाग व स्मारक रस्त्याच्या कामाचा प्रारंभ केला. येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नामफलकाचे व युवक राष्ट्रवादीने आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटनही झाले. यावेळी आ. पाटील यांनी मारुती माने यांच्या स्मारकास भेट देऊन पाहणी केली. या संयुक्त समारंभात ते बोलत होते.
सरपंच सोनाताई गायकवाड, माजी उपसभापती दत्ता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, मोदी यांनी प्रभावी भाषणे करून लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचा झंझावात पाहताना वाटायचे, आता यांची सत्ता २०-२५ वर्षे तरी हलणार नाही. मात्र देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.दत्ता पाटील म्हणाले, आ. पाटील यांनी सत्ता असताना आपल्या गावाला मोठा निधी देऊन गावाच्या विकासाला गती दिली आहे. विनोद वडगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नाजू पाटील, सर्जेराव पाटील, आण्णासाहेब तामगावे, बाळासाहेब केरीपाळे, रावसाहेब कोरे, अतुल पाटील, ऋषिकेश पाटील, अमित चौगुले, संग्राम चव्हाण, सुनील पाटील, अक्षय पाटील, राजरत्न कांबळे, सागर चौगुले उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडेलराज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करू शकते. जनतेने पाच वर्षात भरपूर भोगले असल्यामुळे ती भुलणार नाही, असे सांगून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही स्पष्ट केले.