रत्नागिरी : आई - वडिलांची सध्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर वाताहत होत आहे. पुण्या - मुंबईसारख्या ठिकाणी तर हे चित्र भयावह आहे. जे आपल्या आई - वडिलांना सांभाळू शकत नाहीत, ते देशाला काय सांभाळणार, असा मार्मिक सवाल पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी ‘जीवन आनंद’चे संस्थापक संदीप परब यांनी आपल्या गौरव कार्यक्रमात केला.आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक, पुणे आयोजित पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मुंबई व सिंधुदुर्ग येथे काम करणाऱ्या ‘जीवन आनंद’ या सेवाभावी संस्थेला काल (सोमवारी) प्रदान करण्यात आला. या संस्थेचे संस्थापक संदीप परब यांना नाट्य संमेलनाध्यक्ष अरूण काकडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मदर तेरेसा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मानवतेचा ध्यास घेतलेले परब आणि त्यांचे सहकारी यांनी अणाव दाबाची वाडी येथे ‘आनंद आश्रम’ हा पहिला वृद्धाश्रम सुरू केला. त्यापाठोपाठ आता ‘संहिता आश्रम’ हा अपंग व मनोरूग्णांसाठी दुसरा उपक्रम सुरू केला आहे. निरलस वृत्तीने कार्य करणाऱ्या या संस्थेला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. निवड समितीमध्ये समावेश असलेले सतीश कामत, सुहास विध्वंस, भास्कर शेट्ये, डॉ. शरद प्रभुदेसाई उपस्थित होेते. यानंतर आविष्कार, मुंबई निर्मित उर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ आत्मकथनावर आधारित दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. यात नंदिता धुरी, शुभांगी सावरकर आणि शिल्पा साने यांंचा सहभाग होता.(प्रतिनिधी)नपुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार संदीप परब यांना अरूण काकडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सतीश कामत, भास्कर शेट्ये, सुहास विध्वंस, डॉ. शरद प्रभुदेसाई उपस्थित होते. यापूर्वी रसिकांसाठी सादर झालेल्या ‘आयदान’ नाटकातील नंदिता धुरी, शुभांगी सावरकर आणि शिल्पा साने यांच्या कलेने रसिकांची दाद मिळवली.
आई-वडिलांना सांभाळू न शकणारे देशाला काय सांभाळणार : परब
By admin | Published: November 04, 2014 9:54 PM