कोल्हापूर : महानगरपालिकेने घरफाळा, पाणीपट्टीसह करवाढीचे अनेक प्रस्ताव महासभेकडे सादर केले असले तरी यावर्षी सर्वसामान्य शहरवासीयांवर कोणतीही करवाढ लादली जाणार नाही, असे स्पष्टीकरण महापौर हसिना फरास यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले. विकासकामांसाठी पैसे लागतात ही खरी गोष्ट असली तरी सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादून तो करणे अयोग्य आहे, असे महापौर म्हणाल्या. शहरवासीयांवर घरफाळा, पाणीपट्टीवाढीसह आरोग्य सेवेचे दर, अग्निशमन, रुग्णवाहिका, शववाहिका यांच्या भाड्यात वाढ करण्याचे प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे पाठविले आहेत. प्रशासनाने आपले काम केले, आता आम्ही आमचे काम करणार आहोत. करवाढीच्या संदर्भात आम्ही आमची बाजू एकदा स्पष्ट केली आहे. ८१ नगरसेवकांचा करवाढीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर माझ्या कारकिर्दीत कोणतीही वाढ करून देणार नाही, असे फरास यांनी सांगितले. करवाढीचे प्रस्ताव दिल्यानेच उत्पन्न वाढविले जाऊ शकते, असा अधिकाऱ्यांनी स्वत:चा समज करून घेऊ नये. प्रशासनाने उत्पन्नवाढीचे अन्य मार्ग शोधावेत. घरफाळा विभागास सध्याचे जे ५२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यापैकी ४२ कोटींची वसुली झालेली आहे. उर्वरित वसुली होण्याकरीता प्रभावी पद्धतीने यंत्रणा कामास लावावी. अन्य विभागांनीही त्यांची वसुली शंभर टक्के करण्यावर जोर द्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. घरफाळा आकारताना तो किती आकारावा, रेडिरेकनरचा दर कोणत्या वर्षाचा असावा हे ठरविण्याचे अधिकार महासभेला आहेत. दर चार वर्षांनी दर निश्चित करावेत, असा नियम आहे. पण ते किती दराने करावेत हे महासभाच ठरविणार आहे. त्यामुळे आहेत तेच घरफाळा दर असावा, असे आमचे मत असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. उत्पन्नवाढीसाठी कोणते पर्याय शोधले जावेत, पाणीपट्टी वाढ न करता उत्पन्न कसे वाढविता येईल यावर चर्चा करण्याकरीता सर्व पदाधिकारी, सर्व पक्षांचे गटनेते, प्रमुख नगरसेवक यांची संयुक्त बैठक येत्या दोन-चार दिवसांत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.करवाढीच्या संदर्भात आम्ही आमची बाजू एकदा स्पष्ट केली ८१ नगरसेवकांचा करवाढीला तीव्र विरोध आहे.
घरफाळाच काय, कोणतीही करवाढ होणार नाही : फरास
By admin | Published: February 21, 2017 1:15 AM