कोल्हापूर : यांना जर झोपेतही सरकार जाईल, असे वाटत असेल तर मी काय करू, अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘ईडी’संदर्भातील आरोपांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, काहीही घडले की भाजपवर टीका करायची, असा एककलमी कार्यक्रम झाला आहे. ईडी ही केंद्र सरकारची तपासयंत्रणा आहे. त्यांचा संबंध आमच्याशी जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यांनी भाजपमधील १०० च काय २४० जणांची यादी द्यावी आणि कारवाईसाठी पाठपुरावा करावा. ईडी अचानक कारवाई करत नाही. काहीतरी असेल म्हणूनच नोटीस पाठविली असेल ना, मग भाजपच्या नावाने शंख करायची गरज काय, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिला आहे; त्याचा दुरूपयोग सध्या सुरू आहे. परंतु या खालच्या पातळीवरील टीकेने आम्ही विचलित होत नाही. संजय राऊत आणि विरोधकांना डॉ. बाबासााहेब आंबेडकर यांची घटना मान्य नाही त्याचे हे द्योतक आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.