कोल्हापूर : राज्य सरकारने रिक्षाचालकांकरिता आर्थिक मदत जाहीर केली आहे; पण ती कधी आणि केव्हा मिळणार आहे. याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने माहिती जाहीर करावी, अशी मागणी काॅमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिव्हन अल्वारिस यांंच्याकडे बुधवारी केली.
मागील महिन्यांपासून राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे व्यवसाय नसल्याने रिक्षा व्यावसायिक अर्थिक संकटात सापडले आहेत. यात कल्याणकारी मंडळ अजूनही गठित झालेले नाही. राज्य शासनाने रिक्षाचालकांना काही अर्थिक मदत जाहीर केली आहे. ती कधी व केव्हा मिळेल याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ते जाहीर करावे. हा व्यवसाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे. त्यामुळे कार्यालयाकडे नोंद असणारे रिक्षा परवानाधारक, परमीटधारक व रेशन कार्डवर नमूद असलेल्या घरातील व्यक्तींना कोविड लसीकरण करावे. वाढलेली महागाई व घटलेली उत्पन्नामुळे रिक्षा टेरिफचे दर बदल होऊनही व मीटर कॅलिब्रेशन करणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे कार्यालयानेच सही शिक्क्यानिशी टेरीफ कार्ड उपलब्ध करावीत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांनी वित्तीय संस्था, बँकांकडून रिक्षासाठी घेतलेली कर्जे आहेत. त्याच्या वसुलीसाठी तगादा व जप्ती किंवा दंड व्याज लावू नये. याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित संस्थांना समज द्यावी. या कालावधीत विमा व परमीट नूतनीकरणाची मुदत वाढवून द्यावी आदी मागण्यांचा या निवेदन समावेश होता.
यावेळी अविनाश दिंडे, जाफर मुजावर, श्रीकांत पाटील, संजय मोळे, नरेंद्र पाटील, ॲड. बाबा इंदुलकर आदी उपस्थित होते.