कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा महापालिकेने अद्याप हेरिटेज समितीकडे सादर केलेला नाही. समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत समिती अध्यक्ष व सदस्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना याबाबतची विचारणा केली. अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी तो हेरिटेज समितीकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे तरीही अद्याप महापालिकेने सदरचा आराखडा अधिकृतरित्या समितीला सादर केलेला नाही. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजा परिसरात उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाला हेरिटेज समितीचा विरोध आहे. अमरजा निंबाळकर यांनी हा मुद्दा पर्यटन समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. मात्र, तो रेटून नेण्यात आला. समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षा अमरजा निंबाळकर व उदय गायकवाड यांनी आराखड्याच्या प्रस्तावाची विचारणा केली. त्यावर मनपा अधिकाऱ्यांनी उद्या प्रत देऊ, असे सांगितले. दर्शन मंडपात किती व्यक्ती मावतील, मंडपासाठी अन्य जागांचा सर्व्हे केला का, अशा कोणत्याही प्रश्नांना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना समर्पक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे केवळ हेरिटेजचे नियम आणि दर्शन मंडपाची जागा यावर तोंडी चर्चा झाली. संरक्षित वास्तूंसमोरील जाहिराती हटविणार कोल्हापुरातील अनेक वास्तू हेरिटेजच्या यादीत आहेत. मात्र, जाहिरातींच्या मोठ्या फलकांमुळे त्यांचे सौंदर्य झाकोळले गेले आहे. वास्तूंसमोरील या सर्व जाहिराती हटवण्यात याव्यात, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या पडलेल्या संरक्षण भिंतीबाबतचा निर्णय प्रत्यक्ष पाहणीनंतर घेण्यात येणार आहे.
आराखड्याचे ‘हेरिटेज’कडे सादरीकरण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 12:58 AM