कोल्हापूर : पाटी-पेन्सिल हातात धरून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याच्या वयातील आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी अनेक लहान मुले कोल्हापुरात भीक मागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यात कोल्हापूरबरोबरच कर्नाटक, हैदराबाद येथील मुले-मुलींचा समावेश आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालसंरक्षण समित्या अधिक सक्षम होणे आवश्यक आहे.
स्वत: आणि आपल्या मुलांच्या माध्यमातून भीक मागणे ही कोल्हापूर, पिंपळगाव (ता. कागल), मिरज, कर्नाटक, हैदराबाद राज्यातील झोपडपट्टी परिसरातील काही लोकांनी आपली उपजीविका बनवली आहे. शाळा बंद असल्याने आणि ऑनलाईन शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने भीक मागण्यासाठी लहान मुलांचा त्यांच्या पालक, नातेवाईकांकडून वापर केला जात आहे. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोड, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, राजीव गांधी पुतळा परिसर, रंकाळा चौपाटी परिसर, रंकाळा बसस्थानक, आदी ठिकाणी लहान मुले-मुली भीक मागत असल्याचे दिसून येते. काहीजण लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेश परिसरात फिरून भीक मागतात. दिवसभर भीक मागून सायंकाळी सहाच्या सुमारास ते आपापल्या घरी निघून जातात. त्यांचे नाव, ते कुठे राहतात, त्यांचे आई-वडील काय करतात, याबाबत विचारणा करताच ते तेथून पळून जातात.
मध्यवर्ती बसस्थानक परिसर
मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळ असलेल्या राजीव गांधी पुतळा आणि वटेश्वर मंदिरालगत सोमवारी सकाळी काही महिला, वृद्ध, पुरूष भीक मागत बसले होते. तेथील दोन महिलांसमवेत चार लहान मुलीदेखील होत्या. त्यांना ‘लोकमत’चे छायाचित्रकार कॅमेराबद्ध करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच या मुलींनी आपले चेहरे लपवले आणि पालकांच्या सांगण्यावरून त्या न्यू शाहुपुरीच्या दिशेने पळून गेल्या.
रेल्वे स्थानक परिसर
भीक मागण्यासाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, मिरज येथून रेल्वेने लहान मुले-मुली कोल्हापुरात येतात. काही रेल्वे स्टेशन परिसरात थांबून तेथून शहरातील विविध भागांमध्ये जातात. सायंकाळी पुन्हा रेल्वेने आपल्या राहत्या ठिकाणी निघून जातात. कोरोनामुळे सध्या पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने बाहेर येणारी अशी मुले-मुली सोमवारी दिसल्या नाहीत.
बालहक्क कोण मिळवून देणार?
अल्पवयीन मुलांचा भीक मागण्यासाठी वापर करणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे मुलांचा वापर थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर मार्गांनी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नागरिकांनी मुलांना भीक देणे बंद करावे. जी व्यक्ती मुलांना भीक मागायला लावते, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या बालसंरक्षण समित्या सक्षम केल्या पाहिजेत.
- अतुल देसाई, बाल अधिकार कार्यकर्ते.
तावडे हॉटेल परिसर, पिंपळगाव, जयसिंगपूर, वडगाव, इचलकरंजी येथील झोपडपट्टी परिसरातील काही नागरिकांनी आपल्या मुलांसमवेत भीक मागणे ही आपली उपजीविका बनवली आहे. अशी लहान मुले ज्याठिकाणी भीक मागतात, त्याठिकाणी शासनाने रेस्क्यू ऑपरेशन करावे. बालसंरक्षण समित्यांनी अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करावे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
- सुभाष नारे, अध्यक्ष, स्नेहसंवर्धन सेवाभावी संस्था.
060921\06kol_4_06092021_5.jpg
०६०९२०२१-कोल-स्टार डमी ११३९)