कोल्हापूर : पानसरे अण्णांना उमातार्इंनी आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या पानसरे अण्णांबरोबरच आपल्या अंगावर त्यांनी झेलल्या. या हल्ल्यात अण्णांचे निधन झाल्याचे वृत्त उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या. त्यांना या घटनेचा इतका धक्का बसला की, काही काळ त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी रविवारी (दि. १) त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितले.आपल्यातून अण्णा निघून गेल्याचे सांगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त डॉक्टर जोपर्यंत परवानगी देत नाहीत, तोपर्यंत न सांगण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दहा दिवसांत उमातार्इंची प्रकृती दिवसागणिक सुधारत होती. त्यांना व्हीलचेअरवरूनदेखील फिरविण्यात येत होते. त्या बोलू लागल्यानंतर प्रत्येक दिवशी कॉम्रेडांची तब्येत कशी आहे, साहेबांची तब्येत बरी आहे ना?, त्यांची काळजी घ्या, असे त्यांना भेटणाऱ्या नातेवाईक आणि पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना त्या सांगत होत्या. यावेळी नातेवाईक, कार्यकर्त्यांना गलबलून आले, तरी ते अण्णा बरे असल्याचे सांगत होते. उमातार्इंची प्रकृती स्थिर व उत्तम असल्याने त्यांना अण्णांचे निधन झाल्याचे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरांनी सांगितले. त्याचा त्यांना इतका धक्का बसला की, त्यांच्या तोंडातून काहीकाळ एकही शब्द फुटला नाही शिवाय स्तब्ध झाल्या. त्यानंतर त्यांच्या बहिणींजवळ त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियांचे टाके काढण्यात आले आहेत. त्यांनी सोमवारी रुग्णालयातील आयसीयू युनिट बाहेरील मोकळ्या जागेत व्हीलचेअरवरून फेरी मारली. (प्रतिनिधी)एकमेकांचा मोठा आधारगेल्या बारा वर्षांपूर्वी अवी पानसरे यांचे अचानक निधन झाले. मुलगा गेल्याच्या धक्क्यातून उमाताई लवकर सावरल्या नव्हत्या. त्यानंतर अण्णा त्यांना बाहेरील कार्यक्रम, अन्य ठिकाणी जाताना कायम समवेत घ्यायचे. ते दिवसातील अधिकतर वेळ एकमेकांसोबत असायचे. त्या दोघांचा एकमेकांना मोठा आधार होता शिवाय त्यांच्यातील भावनिक बंध अतूट होते.
अण्णा गेल्याचे ऐकून उमाताई झाल्या ‘स्तब्ध’
By admin | Published: March 02, 2015 10:05 PM