कोल्हापूर : मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळे तसेच चबुतरे यांच्या स्थिरतेचा (स्टॅबिलिटी) तसेच संरचनात्मक लेखापरीक्षणाचा (स्ट्रक्चरल ऑडिट) विषय चर्चेत आला असून कोल्हापूर शहर परिसरातील महापुरुषांचे जे पुतळे उभा करण्यात आले आहेत, त्यांच्या तपासणी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कोल्हापूर शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे उभे करण्यात आले आहेत. त्याला आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. शहरातील कावळा नाका चौकातील छत्रपती ताराराणी यांचा दोन पायांवर उभा असलेला अश्वारूढ, शिवाजी विद्यापीठ आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीन पायांवर उभा असलेला अश्वारूढ, वरुणतीर्थवेश गांधी मैदानावर उभारण्यात आलेला महात्मा गांधींचा पुतळा,दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, महापालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील भाऊराव पाटील तसेच राजीव गांधी यांचा पुतळा, मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा असे महापुरुषांचे भव्य व मोठे पुतळे कोल्हापूर शहरात आहेत.
कोणाचेच गांभीर्याने लक्ष नाही
- कोल्हापुरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी ज्या-त्या वेळी पुतळा समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून पुतळे उभे करण्यात आले. त्यानंतर ते महापालिकेकडे वर्ग झाले. महापालिका प्रशासनाकडून आठवड्यातून एक-दोनवेळा या सर्व पुतळ्यांची स्वच्छता केली जाते, तसेच जयंती, पुण्यतिथी दिवशी पूजन केले जाते; परंतु या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा कधी प्रश्न उद्भवला नाही.
- त्यामुळे महापालिकेसह कोणाचेच त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष गेलेले नाही; परंतु आता हे पुतळे उभे करून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्याकाळात उभे करण्यात आलेले चबुतरे किती मजबूत आहेत, याची एकदा तपासणी करण्याची आवश्यकता मालवण दुर्घटनेनंतर वाटत आहे.
- महापालिका प्रशासनाने आपल्या यंत्रणेमार्फत या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याची स्टॅबिलिटी, स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासली पाहिजे, अशी सूचना समोर आली आहे.