एकनाथ पाटील -- कोल्हापूर--खेळायला जातो म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो...कृष्णा ऊर्फ आर्याची आई रेल्वे स्थानकावर स्क्रॅप गोळा करते. तिला शोधण्यासाठी आम्ही तिघेजण गेलो होतो. शोधताशोधता आम्ही रेल्वेत चढलो...अचानक रेल्वे सुरू झाली...अन् आम्ही भीतीने खाली उतरलोच नाही, अशी माहिती रेल्वेतून भरकटलेल्या पवन अनिल आवळे (वय ११) या मुलाने शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील गुन्हेगारीचे वास्तव्य म्हणून जवाहरनगरची ओळख आहे. गँगस्टार, चोऱ्या, लूटमारीमध्ये येथील तरुणांसह महिलांचा वाढता सहभाग आहे. आजूबाजूच्या गुन्हेगारी वातावरणाचा परिणाम येथील लहान मुलांवर होत आहे. येथील पवन आवळे, कृष्णा तुकाराम झाडबुके (१०) व त्याचा भाऊ यश (७) हे तिघेजण गुरुवारी रेल्वेतून प्रवास करत होते. प्रवासी अमित पवार यांना संशय आल्याने त्यांनी या तिघांना मिरज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जवाहरनगर पत्ता सांगितला. त्यावरून पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने ही मुले रेल्वेतून प्रवास करत असल्याचा संशय व्यक्त केला. या तिन्ही मुलांमध्ये पवन हा मोठा होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने कृष्णा व यशची आई स्क्रॅप गोळा करते, ती रेल्वे स्थानक परिसरात नेहमी फिरत असते. त्यामुळे तिला भेटण्यासाठी आम्ही रेल्वे स्थानकावर आलो. याठिकाणी शोधाशोध केली पण ती दिसली नाही. रेल्वेत असेल म्हणून तिला शोधण्यासाठी रेल्वेत चढलो असता रेल्वे निघाली. खाली उतरायचे कसे म्हणून आम्ही रेल्वेत बसून राहिल्याचे त्याने सांगितले. पतीच्या निधनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुलगी व दोन मुलांची जबाबदारी संगीता आवळे यांच्यावर पडली आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. राहायला झोपडी, दोनवेळच्या जेवणासाठी दिवसभर धुण्या-भांड्यांची कामे करून संसाराचा रहाटगाडा चालवितात. त्यांची मुलगी शुभांगीसह दोन्ही मुले वीर कक्कय विद्यालयात शिकत आहेत. लहान मुलगा पवन हा पाचवीमध्ये शिकतो. गुरुवारी सकाळी पवन हा बाहेर खेळायला जातो म्हणून बाहेर पडला. संगीता या धुण्या-भांड्याची कामे करून दुपारी घरी आल्या. इतक्यात रेल्वे पोलिसांचा निरोप आला. त्या तातडीने मिरजेला गेल्या. पोलीस ठाण्यामध्ये बाकड्यावर तीन लहान मुले बसलेली होती. त्यामध्ये त्यांचाही मुलगा पवन बसून होता. भीतीने अंग थरथरत असलेल्या संगीता यांना पोलिसांनी सावरले. त्यानंतर त्यांचा व कृष्णाच्या नातेवाइकांचा जाब-जबाब घेऊन तिघांनाही त्यांच्या स्वाधीन केले. स्कूल बोर्डाकडून चौकशी पवन आवळे हा वीर कक्कय विद्यालयात पाचवीमध्ये शिकतो. तो त्याचे मित्र मिरजेला गेल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने (स्कूल बोर्ड) या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. त्यानुसार शिक्षण विभागाचे विजय माळी, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र हळिज्वाळे, शिक्षक उमेश देसाई यांनी तिन्हीही मुलांच्या घरी शुक्रवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर पवन आवळे हा शाळेला असून, कृष्णा व यश ही दोन मुले शाळेला नसल्याचे स्पष्ट झाले. बहिणीने दिला जबाब संगीता आवळे या अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचा लेखी जबाब कसा घ्यायचा? असा प्रश्न मुखाध्यापक व शिक्षकांना पडला. अखेर पवनची थोरली बहीण शुभांगी हिने स्वत:च्या हस्ताक्षरात जबाब लिहून दिला. त्यावर संगीता यांचा अंगठा घेतला. शाळेतील पवनच्या गैरहजेरीचे रेकॉर्ड शिक्षकांनी त्याच्या आईसमोर ठेवले. हा जबाब सुरू असताना पवन बिनधास्तपणे शिक्षकांच्या समोर खुर्चीवर बसून दंगामस्ती करीत होता. नशीब बलवत्तर म्हणूनच ही तीन मुले पुन्हा आमच्या आश्रयाला आली. अन्यथा भरकटलेल्या या मुलांची कोणीतरी विक्री केली असती किंवा चोऱ्या, लूटमार करण्यास भाग पाडले असते. मिरज रेल्वे पोलिसांचे आम्ही आभारी आहे. - संगीता आवळे (पालक)
‘कृष्णा’च्या आईला शोधताना रेल्वेने केली ताटातूट
By admin | Published: January 29, 2016 11:13 PM