लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत महानगरपालिकेच्या ताब्यातील खुल्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम रखडली आहे. या संदर्भात महापालिकेत झालेल्या बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अद्याप या मोहिमेचे नियोजन केलेले नाही.
शहरातील अतिक्रमण हा नेहमी चर्चेचा विषय असतो. कितीही अतिक्रमणे हटविली तरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा तिथे अतिक्रमणे होतातच. गेल्या महिन्यात महापालिकेत झालेल्या बैठकीत प्रशासक बलकवडे यांनी नगररचना कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना संयुक्तपणे अतिक्रमणाविरुद्ध मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्रशासकांच्या आदेशानंतर नगररचना व सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांची शोधमोहीम घेण्याकरिता काही अवधी घेतला. एक महिना झाला, केवळ शहरातील १० जागांचा शोध घेण्यात आला असून, तेथील अतिक्रमणे काढण्याचे निश्चित केले आहे; परंतु प्रत्यक्षात कारवाईला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
विविध कारणांसाठी आरक्षित केलेल्या आणि सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३५० ते ४०० जागा पडून आहेत. त्यामध्ये डीपी रोडच्या जागाही आहेत; परंतु त्या विकसित न झाल्याने तसेच त्या ठिकाणी तारेची अथवा दगडी भिंतीची कंपौंड वॉल उभारली नसल्यामुळे या खुल्या जागेत काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. या जागेतील अतिक्रमणे काढून त्या जागा नागरिकांना सार्वजनिक वापरासाठी देणे आवश्यक आहे; म्हणूनच प्रशासक बलकवडे यांनी तशा सूचना दिल्या होत्या.