कोल्हापूर : दुचाकीवरून ट्रिपल सीट जात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी (दि. १९) रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ कारवाई केली. या तरुणांचा आवाज ऐकून देशमुख हे स्वत:च निवासस्थानाबाहेर आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी आहे. बुधवारी रात्री दसरा चौक ते कसबा बावडा रस्त्यावरील पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाजवळ काही तरुण हुल्लडबाजी करीत होते. त्यांच्या आवाजाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे निवासस्थानातून बाहेर आले.
त्यांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना व जलद कृती दलाच्या जवानांना दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सांगून हा प्रकार वाहतूक शाखेस कळविला. तत्काळ वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी ११ दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेने ११ दुचाकीस्वारांना प्रत्येकी २०० रुपये असा २२०० रुपये दंड केला असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले.