सुहास जाधव - पेठवडगाव--आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने पेठवडगाव नगरपालिकेने क्रीडांगणासाठी ४० लाखांची तरतूद केली. यातून इनडोअर क्रीडांगण उभारण्याचा संकल्प केला होता; मात्र दहा वर्षे हे काम रेंगाळले आहे. आता तर हे कामच बंद आहे. समोरील मैदानाच्या विकासाकडेही पालिकेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अनेक नवोदित क्रीडापटू, खेळाडू यांना क्रीडांगणाच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. या क्रीडांगणाला ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा सवाल करत येथे इन्डोअर क्रीडांगण त्वरित विकसित करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत.क्रिकेट तसेच तलवारबाजीमध्ये येथील स्थानिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावली आहे. क्रीडा क्षेत्रात वडगावची मोहर उठवावी, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. १९८३ ला छत्रपती शाहू महाराजांच्या वडगाव-अंबप रस्त्यावरील शेरी पार्कात सुमारे चार एकर (१५२ गुंठे) जमीन क्रीडांगणासाठी आरक्षित केली. या जागेचे हस्तांतरण १९९५ ला पालिकेने करून घेतले. तसेच क्रीडांगणाला संरक्षक भिंत घातली. या जागेचा विकास २००५ ला सुरू केला. क्रीडांगणासाठी पालिकेने राज्य शासनाकडून ‘युडी’ सहा योजनेतून अनुदान व कर्जाऊ रक्कम घेतली.या निधीतून इनडोअर हॉल ४० बाय ८० चे दुमजली बांधकाम सुरू झाले. या प्रस्तावित बांधकाम आराखड्यात स्त्री, पुरुष कपडे बदलण्याच्या खोल्या, आॅफिस, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बाल्कनी, आदीसह २०० मीटर धावपट्टी अशी कामे करण्यात येणार होती. या सभागृहात विवाह, करमणुकीच्या कार्यक्रमासाठी पाच हजार स्क्वेअर फूट बांधकामाचे नियोजन होते.सध्या इमारतीचे १६ लाख रुपयांचे काम झाले होते. मात्र, सळी व सिमेंटच्या दरात अचानक प्रचंड वाढ झाली. त्यामुळे ठेकेदाराने वाढीव दरातील फरक रकमेची मागणी केली. पालिकेने ‘प्राईस सीएल’ म्हणजे वाढीव दर देण्याची तरतूद नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे ठेकेदाराने काम थांबवले. याप्रश्नी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. आता या अपूर्ण इमारतीची पडझड झाली आहे. या इमारतीत काहींनी आसरा घेतला आहे. या परिसरात स्वच्छता नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संरक्षक भिंंतीला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहेत. अनेक तरुण मंडळे, क्रीडाक्षेत्रात उदासीन आहेत. नामांकित शैक्षणिक संस्थांनी आपल्या थोड्याफार स्वरूपात क्रीडांगणाची सोय केलेली आहे. मात्र, बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाला चालना देणाऱ्या क्रीडाक्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.
पेठवडगावच्या क्रीडांगणाला ‘अच्छे दिन’ कधी?
By admin | Published: October 09, 2015 11:18 PM