कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या किरणोत्सव मार्गातील सर्वेक्षण पूर्ण झाले; पण महापालिकेकडून अॅटोकॅड ड्रॉर्इंग नकाशा मिळत नसल्यामुळे समितीने अद्याप किरणोत्सव सर्वेक्षण अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे किरणोत्सव मार्गावरील सर्वेक्षण अहवाल कधी सादर करणार, अशी विचारणा भक्त करत आहेत. १५ जानेवारीपासून श्री अंबाबाई देवीच्या मार्गातील किरणोत्सव मार्गाच्या सर्वेक्षणाला महापालिकेने नियुक्त केलेल्या समितीने प्रत्यक्षात सुरुवात केली. समितीतील सदस्य केआयटी महाविद्यालयाचे स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रा. किशोर हिरासकर यांच्या नेतृत्वाखाली ‘टोटल स्टेशन’ या उपकरणाद्वारे प्रथम देवीचा गाभारा, पितळी उंबरा व त्यानंतर गरुड मंडपात सर्वेक्षण झाले. त्यानंतर श्री अंबाबाई देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यामध्ये या किरणोत्सव मार्गात येणाऱ्या इमारती, मोबाईल टॉवर, आदींची पाहणी केली. या अडथळ्यांबाबत महापालिका प्रशासनाला सांगितले.दरम्यान, १८ जानेवारीला महापौर अश्विनी रामाणे यांनी किरणोत्सव मार्गाची पाहणी केली व समितीतील सदस्यांबरोबर चर्चा करून मार्गातील अडथळे दूर करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर समितीने संपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले. तथापि, महापालिका प्रशासनाने या मार्गावरील सर्वेक्षण करण्यासाठी यापूर्वी जो नकाशा दिला आहे, तो जुन्य विकास नियमावलीप्रमाणे दिल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे सर्वेक्षण अहवाल सादर केलेला नाही.किरणोत्सव मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आम्हाला अॅटोकॅड ड्रॉर्इंग नकाशाची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तो लवकर द्यावा. त्यानंतर महापालिका प्रशासनाला अहवाल सादर करू. - प्रा. किशोर हिरासकर,समिती सदस्य तथा स्थापत्यशास्त्र विभाग, केआयटी, कोल्हापूर.
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव मार्गाचा सर्वेक्षण अहवाल कधी?
By admin | Published: March 02, 2016 1:00 AM