कोपार्डे : दोन दिवस झाले पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील ठिकठिकाणी आलेले पाणी कमी झाले आहे. बालिंगा पुलाजवळील रस्त्यावर पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पण रस्त्यावरील पाणी कमी झाले तरी पुलाजवळील पाणी पातळी कमी झाल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आठवडाभर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोका पातळीवर पोहोचले होते. सर्व महामार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद केले होते. ब्रिटिशकालीन बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीची पाणीपातळी मच्छिंद्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी आले नसतानाही पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी बुधवारी बंद केला होता.गुरुवारी पहाटे दोनवडे बालिंगा पुलादरम्यान रस्त्यावर चार फूट पाणी आले होते. यामुळे गेले दोन दिवस वाहतूक बंद केली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू कमी होत आहे. पाणी कमी झाले तरी पुलाजवळ पुराची पाणी पातळी मच्छिंद्रीच्या खाली गेल्याशिवाय पूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे या मार्गावरून शहरात जाणाऱ्या नोकरदार, शाळकरी विद्यार्थी, दूध, भाजीपाला विक्री अडचणीत येणार आहे. अधिकारांच्या भूमिकेवर लोकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मच्छिंद्रीपेक्षा नदीपात्रातील पाणी कमी झाले तरच धोका पातळी कमी होईल. ज्या पातळीवर वाहतूक बंद करण्यात आली त्या पातळीवर पाणी आल्याशिवाय वाहतुकीला पूल खुला होणार नाही. सर्वांनी सहकार्य करावे. - शुभम पाटील, उपअभियंताकोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी बालिंगा पुलावरील रहदारी सुरू होणे महत्त्वाचे आहे. इतर कोणताही मार्ग खुला नसताना रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाल्यानंतर तांत्रिक बाबी सांगून अडवाअडवी केल्यास संघर्ष होईल. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सभापती करवीर