श्रीकांत ऱ्हायकर -- धामोड हिरव्यागार वृक्षांनी नटलेला परिसर... पाखरांच्या मधुर स्वरांची मनाला पडणारी भुरळ... सूर्यास्ताचे विहंगम दृश्य या सगळ्या निसर्गसौंदर्यांनी भरलेला तुळशी धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत राहिला यात कोणतीच शंका नाही. पण, संबंधित प्रशासन व प्रभावहीन अधिकारी वर्ग यामुळे या परिसराला उतरती कळा लागली. याचा तिसरा भाग म्हणजे तुळशी तलाव बागेची दफनभूमीसारखी अवस्था झाली आहे. या बागेला गतवैभव मिळणार का? या एकाच आशेने इथला परिसर या बागेकडे पाहतो आहे.एकेकाळी धामोड येथील जलाशयाच्या सौंदर्यात भर घालून इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला सुखद गारवा देणारा व त्याचबरोबर लहान मुलांसह आबालवृद्धांना मनोरंजनाच्या अनेक सेवा पुरविणारा हा तुळशी बगीचा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडायचा. मात्र, या बगीचाची अवस्था एका दफनभूमीसारखी झाली असून, बागेतील वातावरण भकास बनले आहे. या बगीचाची अवस्था अशी कोणामुळे झाली, हे सर्वांनाच ज्ञात असताना यावर कोणीच बोलत नाही.तुळशी तलावाच्या पूर्णत्वानंतर १९७४-७५च्या दरम्यान पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्या संकल्पनेतून या बगीचाची निर्मिती झाली. धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना करमणुकीसह भुरळ पडली. त्यातच बागेच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिरामुळे तर देवदर्शन व विरंगुळ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. १९९५ पर्यंत हा बगीचा सुंदरतेचे प्रतीकच ठरत होता.पण, त्यानंतर या बागेतील रंगीबेरंगी कारंजे, फुलझाडे, लहान मुलांच्या खेळाचे साहित्य, या सर्व गोष्टी हळूहळू मोडकळीस आल्या. काही अज्ञातांनी या बगीचातील बहुतांश साहित्य गायब करून ते स्क्रॅपवरती विकलेसुद्धा. मध्यंतरी तर एका अधिकाऱ्याने बगीचाच्या वैभवात भर घालणारी भोवतालची संपूर्ण झाडे तोडण्याचा हुकूमच केला अन् बगीचाला उतरती कळा लागली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही स्थानिक लोकांनीच एकत्र येऊन बगीचातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून देवपूजा सुरू केली. तत्पूर्वी हा परिसर म्हणजे तळीरामांचा अड्डाच बनला होता. असे असतानादेखील तुळशी धरणाच्या अधिकारी वर्गाला याकडे लक्ष द्यावे, असे का वाटत नाही? हा संशोधनाचा विषय आहे.लोकांच्या मनोरंजनाचे माध्यम असणारा हा बगीचा सध्या अनेक सुविधांअभावी धूळ खात पडला असून, याला गतवैभव कोण व केव्हा देणार, याकडे परिसरातील लोक नजर लावूनआहेत. (समाप्त)बोेटिंग सुरूकरण्याची मागणीतुळशी जलाशयात रंकाळा तलावाच्या धर्तीवर बोटिंग सुरू करण्याची मागणी होत आहे. बोटिंग सुरू केल्यास पर्यटक आकर्षित होऊन परिसरातील पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.विश्रामगृहाची दुरवस्थातुळशी धरण परिसरात असलेल्या विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. धरण शेजारी असूनही या विश्रामगृहात पाणी मिळत नाही. हे विश्रामगृह सुसज्ज केल्यास पर्यटकांची सोय होणार आहे.
‘तुळशी’तील बाग फुलणार कधी?
By admin | Published: January 12, 2017 10:09 PM