हलकर्णी : एखादा उतारा किंवा दाखला मिळवायचा झाल्यास तलाठी कार्यालयाला हेलपाटे मारण्याची परंपरा हलकर्णीत आजही कायम आहे. आठवड्यातून मोजकेच दिवस भेटणारे तलाठी नेमके कधी भेटतील सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषद मतदार संघातील मोठे गाव असलेल्या हलकर्णी (ता. गडहिंग्लज) गावात पूर्ण वेळ तलाठी कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे.
साधारण ७ हजार लोकसंख्या असलेले हलकर्णी व हजारभर लोकसंख्या असलेले कुंबळहाळ गावचे महसुली काम एकाच तलाठ्यावर चालते. या दोन्ही गावचे महसुली उत्पन्न साधारण २ लाखाच्या आसपास आहे. गावात तीन बँका, सेवा संस्था, ५ पतसंस्था, शाळा-कॉलेज, महासेवा केंद्र आहेत. या ना त्या कारणास्तव त्यांचा संबंध तलाठ्यांशी येतोच. गावाच्या ग्रामपंचायतीसमोर तलाठी कार्यालयही आहे. मात्र नेहमीच या गावाला ठराविक वेळेचा तलाठी मिळतो. त्यामुळे अनेकदा तलाठी कधी येतील हे नेमके सांगता येत नाही. तसे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकांना तलाठी आल्याची खात्री ग्रामपंचायतीकडे करावी लागते.
सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. पालकांना पाल्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासते आहे. सध्या येथील तलाठी हे मेडिकल रजेवर आहेत. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. पर्यायी तलाठी यांची सोय केल्याचे सांगण्यात येते. मात्र संबंधित तलाठी आपल्या तेरणी सजावर कार्यरत असतात. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन हलकर्णीकरांना पूर्णवेळ तलाठी मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.