लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) गावासाठी आतापर्यंत केवळ १५० कोरोना लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे नागरिकांवर पाच-दहा किलोमीटर वरील गावात जाऊन लसीकरण करावे लागते. ४५ च्या पुढील १६५८ नागरिक आहेत, त्यापैकी ८२८ जणांचे लसीकरण झाले असून, गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
नागदेववाडी शहराच्या लगत असल्याने पहिल्या व दुसऱ्या लाटेतही येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे प्राधान्याने लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र, लसीकरण सुरू होऊन साडे तीन-चार महिने झाले तरी गावाला आतापर्यंत केवळ १५० डोस मिळाले आहेत. ४५ वर्षांवरील १६५८ नागरिक आहेत. सरकार या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यास सांगते; मात्र लस उपलब्ध होत नाही. गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नागरिकांनी पाच-दहा किलो मीटरवर जाऊन मिळेल तिथे लसीकरण करून घेतले. त्यामुळे तरी किमान ८२८ नागरिकांना लसीकरण झाले. अद्याप ८३० जण शिल्लक आहेत.
लस वाटपात असमानता
लसीचे वाटप आणि आरोग्य यंत्रणेची मनमानीमुळे सामान्य माणसाला मात्र लसीपासून दूर रहावे लागत आहे. पहिल्या टप्यात राजकीय मंडळींचा दबाव असलेली गावांत ७५ टक्के लसीकरण झाले होते. मात्र, अनेक गावे आजही ४० टक्क्यांच्या पुढे सरकलेली दिसत नाहीत.
कोट-
गावची लोकसंख्येच्या तुलनेत लस उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा आरोग्य यंत्रणेशी अनेक वेळा पाठपुरावा करूनही दाद दिली जात नाही. गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- योगेश ढेंगे, सरपंच, नागदेववाडी