शहरात एकूण ८९४.९२ किलोमीटरचे रस्ते आहेत. यामध्ये शहरांतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या अखत्यारीमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बुजवलेल्या खड्ड्यांच्या रस्त्यांचीही वाट लागली आहे. यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाच्या दर्जावरही शंका उपस्थित होत आहे.
शिवाजी चौक ते पापाची तिकटी, गंगावेश चौक ते दत्त महाराज मंदिर, रेगे तिकटी ते भाजी मंडई, पापाची तिकटी ते महापालिका माळकर तिकटी चौक, बाबूजमाल रोड ते जोतिबा रोड, धोत्री गल्ली ते केएमसी काॅलेज, भवानी मंडप कमान ते जेल रोड, स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर ते वायल्डर मेमोरियल चर्च, सीपीआर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, राजहंस प्रिटिंग प्रेससमोरील भाऊसिंगजी रोड, खरी काॅर्नर चौक, बिनखांबी गणेश मंदिर ते शिवाजी पेठेतील जुन्या बलभीम बँकेसमाेरील, गंगावेश दूध कट्टा परिसर, राजारामपुरी ते शिवाजी विद्यापीठ रोड, कोळेकर तिकटी ते जुनी शाहू बँक, आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक, हे मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. गल्लीबोळातील रस्त्यांची तर पार वाट लागली आहे.
सध्या पाऊस नसल्याने खड्डेमय रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दुचाकीस्वारांना डोळे, श्वसनासंबंधीचे विकार आणि कंबरदुखीचा आजार होत आहे. रिक्षा व इतर चारचाकी वाहनचालकांचेही हाल होत आहेत. खड्डे चुकविताना अपघाता़च्याही घटना घडत आहेत. सातत्याने खड्ड्यांतून वाहन चालविल्याने वाहनेही वारंवार दुरुस्तीला येत आहेत. वाढलेल्या इंधनाच्या दराने हैराण झालेल्या वाहनधारकांना वाहन दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
चौकट
गणेशोत्सवाआधी तरी होणार का ?
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गणेशोत्सव आहे. यानिमित्त शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असते. वाहनांची वर्दळ वाढते. म्हणून गणेशोत्सवाआधी तरी महापालिकाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. खड्डे न बुजविल्यास गणेशभक्तांनाही त्रास होणार आहे.
-चौकट
कसबा बावड्यातील रस्त्यांवर खड्डे
कसबा बावड्यासह शहरालगतच्या उपनगरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
पॅव्हेलियन ते कदमवाडी, शुगरमील कॉर्नर ते एमआयडीसी पूल, झूम प्रकल्पाकडे जाणारा रस्ता खड्डेमय बनला आहे. उपनगरातही अशीच स्थिती आहे.
कोट
शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल.
- नितीन देसाई, प्रभारी प्रशासक, महापालिका.