सतीश नांगरे - लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण (दि. २५) शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील रुग्णांसाठी मोलाचा आधार असलेल्या शित्तूर-वारुण आरोग्य वर्धिनी केंद्रातील रुग्णवाहिका ही गेल्या काही वर्षांपासून ''''ढकल स्टार्ट'''' अवस्थेत दिवस कंठत आहे. या रुग्णवाहिकेस कधी रस्त्यावरचे लोक जमवून धक्का द्यावा लागतो, तर कधी इतर वाहनांनी ओढत न्यावे लागते. आरोग्य विभागाच्यावतीने मात्र याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जात आहे.
डोंगर-कपारीत वसलेली तेरा गावे व वाड्या, वस्त्या या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येतात. धनगर-माळी, गोरगरीब रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र म्हणजे मोलाचा आधार आहे. रुग्णांसाठी जीवनदायिनी असलेली या आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. रोज नित्यनेमाने पाच-दहा मुलांनी ढकलल्याशिवाय तिला स्टार्टर लागणे अवघड झाले आहे. या रुग्णवाहिकेचा स्टेअरिंग जॉईंट व एक पाटा तुटला आहे. जवळजवळ ही गाडी स्क्रॅपलाच आली आहे.
अशा ढकल स्टार्ट असलेल्या रुग्णवाहिकेतूनच डिलिव्हरी पेशंटबरोबरच शस्त्रक्रिया होणाऱ्या व झालेल्या रुग्णांची ने-आण केली जाते. जी कधीही रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. याशिवाय आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या आरोग्याच्या विविध मोहिमा पार पाडण्यासाठी व औषधांची ने-आण करण्यासाठीही हीच रुग्णवाहिका वापरली जाते. या आरोग्य केंद्रातील काही महत्त्वाच्या औषधांचा स्टॉक हा महिन्याभरापूर्वीच संपला आहे. मात्र, ज्या रुग्णवाहिकेतून औषधे आणली जातात तीच नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे रुग्णांना सध्या औषधांनाही मुकावे लागत आहे. अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारी ''''जीवनदायिनी असलेली ही रुग्णवाहिका मरणदायिनी'''' होण्याआधीच आरोग्य विभागाने तिची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
चौकट-
रुग्णांच्या जीवन मरणाशी निगडित असलेल्या रुग्णवाहिकेची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अथवा जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने या आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशा भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
डॉ. निरंकारी (तालुका वैद्यकीय अधिकारी)
या रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करून पूर्ववत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार आहे.
फोटोः बिघडलेली रुग्णवाहिका कासरा लावून टेम्पोने ओढत नेताना. (छाया-सतीश नांगरे)