पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर निधीपैकी न मिळालेला २९ कोटी रुपयांचा निधी २०२४ पर्यंत देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात दिला खरा, मात्र, हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानेच प्राधान्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. निधी देण्याची मूळ घोषणा पवार यांनीच केली आणि तेच निधी द्यायचे विसरून गेले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने २०११ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ४५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. यातून स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲड बायोटेक्नॉलाॅजी मुख्य इमारत व मुलांचे वसतिगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर ॲड म्युझियम कॉम्पलेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाउस व लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र यांची कामे करण्यात येणार होती.
मात्र, हा निधी मंजूर होऊनही विद्यापीठाला लगेच मिळाला नाही. त्यामुळे नियोजनातील ही कामे अद्यापही रखडली आहेत. या मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ १६.१० कोटी रुपयेच मिळाले आहेत. उर्वरित २८.९० कोटी मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.
भैया माने यांनी करून दिली आठवणमुळात हा निधी आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. पुढे सरकार बदल्यानंतर हा निधी मिळण्यास विलंब लागला. गत आठवड्यात कोल्हापुरात सभेच्या निमित्ताने आलेल्या अजित पवार यांना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य भैया माने यांनी विद्यापीठाचा रखडलेला निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर पवार यांनी ३१ मार्च २०२४ पर्यंत हा निधी देण्याची ग्वाही दिली.
कशासाठी निधी | मंजूर निधी | प्राप्त निधी | येणे बाकी | ||
स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲड बायोटेक्नॉलाॅजी
| १० कोटी | ४.५७ | ५.४३ | ||
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट | ८.८५ कोटी | ५.३५ | ३. ५० | ||
राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर ॲड म्युझियम कॉम्पलेक्स | ४.९८ | मिळाला नाही | ४.९८ कोटी | ||
कन्व्हेन्शन सेंटर | १० कोटी | मिळाला नाही | १० कोटी | ||
युवा विकास केंद्र | ३६ लाख | १८ लाख | १८ लाख | ||
गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाउस | ३.१४ कोटी | मिळाला नाही | ३.१४ कोटी | ||
लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र | ३ काेटी | सर्व मिळाला | |||