आर.एस.लाडआंबा : एक वर्षापूर्वी म्हणजे २२ जुलै २०२१ रोजी आंबा घाटात आठ ठिकाणी दरड कोसळून घाट पावसाळ्यात बंद झाला. गेल्या आठ महिन्यांपासून घाटातील तीन ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे व भिंतीचे बांधकाम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला तरी दोन ठिकाणचे बांधकाम चालूच आहे. सध्या वजरे खिंडी लगत खचलेल्या काही भागाचे काँक्रिटीकरण, तर बांबू नर्सरीजवळील रस्त्याचे व कठड्यांचे तीस टक्के बांधकाम शिल्लक आहे.गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रवासी व वाहतूक संघटनांनी लोकप्रतिनिधींना घाटात आणून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या उदासीनतेबाबत जाब विचारला. त्यानंतर घाटातील दरड सफाई व खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला.ढगफुटीसदृश पावसाने घाटात भूस्खलन होऊन तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून संरक्षक कठडे तुटले होते. दरीतून संरक्षण कठड्यांचा पाया सिमेंट काँक्रीटने भरून दरीच्या बाजूने भिंती उभ्या झाल्या आहेत. मात्र, येथील रस्ता पावसाने धुवून गेला आहे. घाटातील सूचना फलक तुटल्याने रात्रीच्या वेळी धुक्यात पुढ्यातील बाजूपट्टी दिसत नाही. त्यामुळे घाटातील प्रवास जिवघेणा बनला आहे.अतिवृष्टीकाळात अवजड वाहनांचे दळणवळण बंद ठेवण्याची मागणी असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे घाटातील रस्त्यांची रया उडाली आहे. अरुंद वळणावर धुक्यात हे खड्डे वाहकाला दिसत नसल्याने अपघात घडत आहेत. सुरक्षित दळणवळणासाठी रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.सुदैवाने या पावसात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली नाही. दोन ठिकाणी किरकोळ पडलेली दरड घाटात मुक्कामी असलेल्या जेसीबीने वेळीच काढून घाट नियमित चालू ठेवल्याचे अभियंता रोहित तावडे यांनी स्पष्ट केले.
तर वीस दिवसांत संरक्षक भितीचे काम
- एम. आय. काउंट इंद्रा कंपनीचे अभियंता रोहित तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाने उसंत दिली, तर वीस दिवसांत संरक्षक भिंतीचे काम होईल, ओझरे खिंडी व कळकदरा येथील वॉल बांधकाम पूर्ण झाले आहे.
- काँक्रिटीकरणाचा काही भाग भराव मजबुतीकरणानंतर होईल. बांधकामाची वर्क ऑर्डर डिसेंबरला मिळाल्याने काम लांबणीवर पडल्याचे स्पष्ट केले.