भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘सीपीआर’मध्ये मंजूर असलेल्या आठ विभागांच्या इमारतींच्या कामांना अजून श्रीगणेशा झालेला नाही. या विभागात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिणामी नूतनीकरण, दुरुस्तीची कामे करण्यासाठी ठेकेदारांच्या ताब्यात आठ इमारती मिळालेल्या नाहीत. आतापर्यंत चार विभागांच्या इमारतींच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे; पण अजून बहुतांश कामे अपूर्ण असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. परिसरात मोठ्या संख्येने पार्किंग करण्यात येणाऱ्या खासगी वाहनांमुळे कामात अडथळा येत आहे.‘सीपीआर’मध्ये मार्च २०२४ पासून विविध विकासकामे केली जात आहेत. रुग्णालय पूर्णपणे रिकामे करून कामे केले असते तर गतीने झाले असते; पण रुग्णांवर उपचार करण्यासाठी पर्यायी मोठी इमारत नसल्याने एकाचवेळी दुरुस्तीची कामे आणि रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिणामी रुग्णांना अनेक अडचणींना, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्ते करण्यासाठी खोदाई केल्याने पाणी आणि ड्रेनेजच्या पाइपलाइन्स फुटल्या आहेत.एका इमारतीमधील विभागातून दुसऱ्या इमारतीमधील विभागात स्ट्रेचरवरून रुग्ण घेऊन जाताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे कामे गतीने करावीत, अशी मागणी होत आहे; पण रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आठ विभागांच्या इमारतीमध्ये कामे सुरू करता आलेली नाहीत. दुरुस्तीची कामे सौरभ कन्स्ट्रक्शन, पुणे आणि रस्त्याची कामे कागलचे राजू इनामदार हे ठेकेदार करत आहेत.
अजून कामे सुरू न झालेले विभाग : बर्न, आय, ऑपरेशन थिएटर, मुख्य इमारत, ब्लड बँक, लायब्ररी, जुना अपघात, कोयना इमारत.
ही कामे झाली पूर्णमुख्य इमारत आणि बाह्यरुग्ण विभागासमोरील रस्ते, कैदी वॉर्ड, कान, नाक, घसा इमारत, मेंटल वॉर्ड इमारत.
दृष्टिक्षेपातील सीपीआर
- वर्ष १८८४ पासून रुग्णांच्या सेवेत
- रुग्णालय १० एकरांत आहे.
- एकूण ३३ इमारती असून, ४१ हजार ५७८ चौरस मीटर इमारतीचे क्षेत्रफळ आहे.
- रोज १५०० ते १७०० रुग्णांवर उपचार.
कोणत्या कामांसाठी किती निधी?
- इमारत दुरुस्ती : ३१ कोटी ९८ लाख
- रस्ते दुरुस्ती : ७ कोटी ९५ लाख
- विद्युत दुरुस्ती : ३ कोटी ८ लाख
कोणत्या इमारतीचे किती टक्के कामदूधगंगा : ७०, वेदगंगा : २५, बाह्यरुग्ण विभाग : ४०, नर्सिंग मुलींचे वसतिगृह ७५, तुळशी १५ टक्के, एनआयसीयू २०, कृष्णा १०, एचईआर ३०
कोणती कामे सुरू आहेत?
- १९ इमारतींची दुरुस्ती, नूतनीकरण.
- ड्रेनेजलाइनचे बांधकाम करणे.
- पाणीपुरवठ्यासाठीचे पाइपलाइन करणे.
- रस्ते काँक्रीटीकरण करणे.