शुभम गायकवाड
उदगाव : कोरोनाने सध्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना प्रतिबंधासाठी खास नेमलेल्या ग्राम समित्या अजूनही निद्रावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे काेरोनाला आळा घालायचा असेल तर ग्राम समित्यांना सक्रिय होण्याची गरज आहे.
ग्रामीण भाग हा सद्य:स्थितीत रुग्णसंख्येच्या बाबतीत कमी दिसत असला तरी सध्या वाढणारी संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. सुरुवातीला कोरोना रुग्ण सापडल्यास त्याचे घर कंटेन्टमेंट करणे, घरातील इतरांची टेस्ट करण्यास भाग पाडणे, शेजारील नागरिकांना समुपदेशन करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मदत करणे, व्यापारी व भाजीपाला व्यावसायिकांना आचारसंहिता घालून देणे, परगावातून किंवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी झाली आहे की, नाही याची पडताळणी करणे ही कामे स्थानिक पोलीस व आरोग्य विभाग करत होता; परंतु रुग्णांची संख्या हाताबाहेर गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम समिती ही संकल्पना गावागावात राबविण्याचे आदेश दिले; परंतु तद्नंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने या समित्यांनी आपले काम बंद केले आहे. ते तातडीने सुरू केले तरच ग्रामीण भागात कोरोनाला रोखले जाऊ शकते.
चौकट : अशी असते समिती
सरपंच- अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, भाजीपाला व्यावसायिक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक.
कोट : ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या नसली तरी तिसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण आहे. गावातील सर्वसमावेशक नागरिकाचा ग्राम समितीमध्ये समावेश असल्याने शासनाच्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी होऊ शकते. आम्ही तात्काळ समितीच्या माध्यमातून काम
सुरू करणार आहोत.
- कलीमून नदाफ, सरपंच, ग्रामपंचायत उदगाव