लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डीवायपी हॉस्पिटॅलिटीमार्फत महानगरपालिका तसेच इतर सर्व शासकीय कर, कर्मचाऱ्यांचे पगार हे नियमितपणे दिलेले आहेत. त्यामध्ये, महानगरपालिका अथवा कोणत्याही शासकीय विभागाचे थकबाकी नाही, असे स्पष्टीकरण माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी सोमवारी केले आहे.
भाजपचे प्रवक्ते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पंढरपूरच्या भीमा कारखाना शेतकरी आणि कर्मचारी यांची ६४ कोटींची देणी अद्याप दिलेली नाहीत. ही देणी कधी देणार हे त्यांनी एकदा जाहीर करावे,अशी विचारणाही पत्रकात करण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे, आदर्श भीमा वस्त्रम, कृष्णा सेलिब्रिटी पार्किंग, भीमा एज्युकेशन सोसायटीचा थकीत घरफाळा या आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. या प्रश्नांची उत्तरे न देता माजी खासदार हेच दिशाभूल करत आहेत. महापालिका व गोकुळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहण्यासाठी महाडिकांचा आटापिटा सुरू आहे. भीमा कारखान्याने कारखान्याने कामगारांचे ३२ कोटी ८० लाख, शेतकऱ्यांचे ३१ कोटी ४१ लाख ८३ हजार, वाहनधारकांचे ८० लाख असे ६४ कोटी २१ लाख अद्याप दिलेले नाहीत. प्रशासनाने साखर गोडावून सील केली आहेत. कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडाची २० महिन्यांची थकीत रक्कम भरली नसल्याने कारखान्यावर कारवाई सुरू आहे. सन २०१८ पासून १४० कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यांचे अंदाजे ७ कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. भीमा कारखान्याच्या या प्रश्नांबरोबरच आम्ही यापूर्वी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर महाडिकांनी दिलेले नाही. या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस ते का दाखवत नाहीत. असा प्रश्न ही पत्रकामध्ये उपस्थित केला आहे.